
पाणीपुरवठा
टॅंकरच्या २२ फेऱ्यांमधून
नागरिकांना पाणीपुरवठा
आजपासून होणार सुरळीत
कोल्हापूर, ता. १९ ः बालिंगा जल उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या कामामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्र बंद राहिल्याने रविवारी शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा बंद राहिला. दिवसभरात विविध ठिकाणी टॅंकरच्या २२ फेऱ्यांमधून नागरिकांना पाणी देण्यात आले. सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
पारेषण कंपनीकडून दिवसभर काम सुरू असल्याने दोन्ही केंद्र बंद राहिली. या केंद्रांमधून शहरातील पाचही वॉर्डमधील काही भागांना पाणीपुरवठा होतो. परिणामी, दुपारनंतर तेथील पाणीपुरवठा बंद झाला. सायंकाळनंतर काम संपल्यानंतर उपसा सुरू केला. रात्रीनंतर संबंधित भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान, आज दिवसभरात सी, डी वॉर्डमध्ये जास्त परिणाम जाणवला. शिवाजी पेठ, मंगळवार पेठेबरोबरच ई वॉर्डमधील काही भागात अपुरा पाणीपुरवठा झाला. दुपारनंतर पाण्याची वेळ असलेल्या भागांना जास्त फटका बसला. अनेकांच्या इमारतीवर पाणी चढवण्यासाठी खासगी टॅंकर मागवावे लागले. याशिवाय कळंबा व कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातून महापालिकेच्या टॅंकरच्या २२ फेऱ्यांमधून विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला. काही भागात सोमवारी सकाळच्या सत्रात कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. शिंगणापूर योजना सुरू असल्याने ए, बी तसेच ई वॉर्डमधील भागात पाणीपुरवठा व्यवस्थित झाला होता, तर ई वॉर्डसाठीच्या शिंगणापूर योजनेवरूनही उत्तरेकडील भागात पाणी देण्यात आले.