महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारपासून

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारपासून

स्पर्धा गुरुवारपासून
सांगलीतच होणार
नामदेवराव मोहिते; ४५० जणींचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २० ः राज्य कुस्तीगीर परिषद व कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवार (ता. २३) व शुक्रवार (ता. २४) रोजी होत असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी आज येथे दिली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४५० कुस्तीगीर सहभागी होत आहेत.
ते म्हणाले, ‘‘स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा विचार आला. त्यावेळी कुस्तीगीर परिषदेत आपण यासाठी पुढाकार घेत स्पर्धा संयोजनाची तयारी दाखवली. जिल्हा तालीम संघातर्फे संयोजन केले आहे. बेडग (ता. मिरज) येथे जिल्हा संघांची निवड चाचणीही पूर्ण झाली. गुरुवारी (ता. २३) खेळाडूंचे आगमन, वजन त्यानंतर दुपारी स्पर्धेला प्रारंभ होईल. शुक्रवारी (ता. २४) महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी अंतिम लढत होणार आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य हणमंत जाधव, जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस प्रताप शिंदे, उपाध्यक्ष विलास शिंदे, कुस्ती निवेदक कृष्णा शेंडगे, संपत जाधव, शिवाजी जाधव, राजेंद्र शिंदे, सुनील मोहिते, रवींद्र गायकवाड, विनायक पाटील, रमेश कोळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

४५ जिल्ह्यांचे समर्थन
कुस्तीगीर परिषदेतील काही नतद्रष्ट लोकांनी पहिल्यांदाच होणाऱ्या या स्पर्धेबाबत वाद-विवाद उभे केले आहे. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या संकल्पनेला तब्बल ४५ जिल्ह्यांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे चांगल्या कामाच्या आड येणाऱ्या लोकांना आपोआप चपराक बसली आहे. आमचीच स्पर्धा अधिकृत असून कोणी कितीही आदळआपट केली तरी या स्पर्धा सांगलीत होणारच, असा विश्वास श्री. मोहिते यांनी व्यक्त केला.

प्रसिध्दीसाठी आरोप करणाऱ्यांनी न्यायालयात जावे
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या स्पर्धेला आक्षेप घेतला असून ती बेकायदेशीर असल्याचा केलेल्या आरोपाबाबत श्री. मोहिते म्हणाले, ‘‘केवळ प्रसिध्दी मिळवण्याच्या हेतूने काहीजण परिषदेवर आरोप करत आहेत. काही आक्षेप वाटत असतील तर त्यांना न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत.

स्पर्धा दृष्टिक्षेपात
ःृ- सर्व वजनी गटात स्पर्धा
- ७६ किलोवरील महिलांचा खुला गटात समावेश
- ३६ जिल्हे व ९ महापालिका असा एकूण ४५ महिला संघांचा सहभाग
- एका संघात १५ याप्रमाणे किमान ४५० खेळाडू
- तीस पंच व इतर अधिकारी अशा सहाशे जणांच्या निवास, भोजनाची व्यवस्था
- खेळाडूंचा प्रवास खर्चही संयोजकांतर्फे देण्यात येणार
- जिल्हा क्रीडा संकुलात दोन मॅटवर स्पर्धा
- विजेत्यास चांदीची गदा व वजनी गटातील विजेत्यांना पुरूष स्पर्धेप्रमाणे बक्षिस
- महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com