तीन किलो गांजा जप्त - दोघे अटक

तीन किलो गांजा जप्त - दोघे अटक

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
तोरस्कर चौक, दानोळीत अड्डा; सव्वातीन किलो गांजा जप्त

कोल्हापूर, ता. २९ ः शेडमध्ये गांजाच्या पुड्या बांधताना तोरस्कर चौकातील एका विक्रेत्याला तर त्याला पुरवठा करणाऱ्या दानोळीतील एकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. बंदेनवाज उर्फ बंडा सोफिशा मकानदार (वय ३९, रा. जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौक, कोल्हापूर) आणि पटू आण्णा धांदले (वय ५१, रा. शांतीनगर, दानोळी, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा सव्वातीन किलो गांजा लक्ष्मीपुरी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती उपनिरीक्षक इकबाल महात यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की तोरस्कर चौक परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर संशयिताच्या घराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. यावेळी बंदेनवाज उर्फ बंडा मकानदार हा विक्रीसाठी गांजाच्या पुड्या भरताना दिसला. तेथेच पंचासह इतर पथकांसोबत गेलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सुमारे सव्वाकिलो गांजा जप्त केला. मकानदार याच्याकडे अधिक चौकशी केली असताना त्याला शिरोळ तालुक्यातील दानोळीतून येथील एका व्यक्तीकडून गांजा मिळाल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार निमशिरगाव फाटा येथे छापा टाकून गांजा विक्रेता पटू धांदले याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन किलो गांजा जप्त केला. दोन्ही कारवाईत एकूण ५७ हजार रुपये किमतीचा सव्वातीन किलो गांजा जप्त केल्याची माहिती उपनिरीक्षक महात यांनी दिली.
दरम्यान अटक असलेल्या मकानदार याला न्यायालयात हजर केले असता, त्याला एक एप्रिलपर्यंत तर धांदले याला तीन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. धांदले याला कोणाकडून गांजा मिळाला, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे उपनिरीक्षक महात यांनी सांगितले.

दहा ग्रॅम पुडीचा दर चारशे रुपये
दहा ग्रॅमची एक पुड चारशे रुपयांना विक्री केली जात असल्याचे छाप्यातील तपासत दिसले आहे. संशयित आरोपी बंडा आणि पटू यांच्याकडून कोण कोणत्या ठिकाणी विक्रीचे अड्डे चालविले जातात. त्यांनी आत्तापर्यंत कोठे गांजा विक्री केला आहे. त्यांचे कर्नाटक कनेक्शन काही आहे काय याचीही माहिती पोलिस कोठडीत घेतली जाणार असल्याचेही उपनिरीक्षक महात यांनी सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com