वासनोली शोध-१

वासनोली शोध-१

वासनोली प्रकल्प

डोंगर कपाऱ्यातील गावे पाण्याने सुजलाम सुफलाम व्हावीत, यासाठी वासनोली (ता. भुदरगड) येथे वासनोली लघुपाटबंधारे प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. मात्र, कामाची निविदा मंजुरीसाठी ९० दिवसांऐवजी तब्बल १८० दिवसांचा विलंब झाला. याशिवाय, चुकीचे मोजमाप, दगड-वाळू किंवा मालवाहन अंतरातील तफावत, भाववाढ सूत्रातील बदलामुळे मूळ अंदाजपत्रकाच्या खर्चात मोठी वाढ झाली. अधिकाऱ्यांनी भाववाढीचा फायदा कंत्राटदाराला करून दिल्याचे माहितीच्या अधिकारातून निदर्शनास येते. निकृष्ट कामाबाबत लोक कारवाईची मागणी करीत असतानाही याकडे अधिकारी आणि शासन दुर्लक्ष करीत आहे. याचा पोलखोल करणारी वृत्तमालिका आजपासून...

़वासनोली प्रकल्पाचा पोलखोल- भाग १

शेतीसाठी पाणी अन कंत्राटदारांसाठी मलई
---
दशकानंतरही प्रकल्प अधूच; सहा कोटींचे अंदाजपत्रक पोचले १३ कोटींवर

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : भुदरगड येथील वासनोली प्रकल्पाचा येथील शेती व शेतकऱ्यांना निश्‍चितपणे फायदा होणार आहे. मात्र, हा प्रकल्प शेती, शेतकरी किंवा इतर नागरिकांसाठी कमी आणि अधिकाऱ्यांनी स्वत:च्या हितासाठीच राबविल्याचे चित्र दिसते. प्रकल्पाची उंची, खोली, लांबी, रुंदी असणारे मूळ संकल्पचित्र संगनमताने बदलल्याने सहा कोटी ४१ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक १३ कोटी ५३ लाख १४ हजारांवर पोचल्याचे दिसते.
वासनोली प्रकल्पासाठी २००९-१० च्या दरसूचीनुसार २०११ मध्ये सहा कोटी ४१ लाख किमतीच्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता दिली. कामाचे आदेशही दिले. कामात १४.१४ टक्के वाढीव दर दिला. या वाढीमुळे प्रकल्प सहा कोटी ९४ लाख ५६ हजार इतक्या किमतीचा झाला. २०१२ मध्ये तशी निविदा स्वीकृत करून कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी संगनमताने पूर्वीचे रेखाचित्र बदलून सुधारित संकल्पचित्र २०१३ मध्ये मंजूर करून घेतले. यात प्रकल्पाच्या भरावासाठी सात मीटर व नऊ मीटर रुंदीचे बर्म (प्रकल्पातील टप्पे) गृहित धरल्याने रुंदीत खर्चात अनावश्‍यक वाढ झाली. रॉक टो, सळी, क्राँक्रिट, रॉक फिलिंग व वाळूच्या गाळणीत सुमारे तीन कोटींची वाढ झाली. ९० दिवसांपर्यंत कामाचे आदेश दिले नाहीत, तर निविदा रद्द होते. येथे मात्र अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांनी आदेश दिले, निविदाही प्रक्रिया रद्द केली नाही. करारानुसार ७२ महिन्यांत प्रकल्प काम पूर्ण करावे लागते. मात्र, २०१२ ते २०२२ पर्यंत वासनोलीसारख्या प्रकल्पाचे काम अजून अधूच आहे.
(क्रमश:)
....
जलसंधारण अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या वासनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामात अनियमितता दिसते. भाववाढीच्या सूत्रातील बदलामुळे शासकीय निधीचा गैरवापर झाला. अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- शरद मोरे, गारगोटी (ता. भुदरगड)
...
वासनोली प्रकल्पाचे काम चांगल्या दर्जाचे झाले. परिसरातील लोकांना याचा फायदा होतो. प्रकल्पात वापरलेले साहित्य दर्जेदार आहे. त्यामुळे शासनाच्या निधीची अनियमिता झाली आहे, असे म्हणता येत नाही.
- विजय आजगेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कोल्हापूर
-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com