अंबाबाई मंदिर पर्यटक सुविधा

अंबाबाई मंदिर पर्यटक सुविधा

मनस्ताप नको; दर्शन व्यवस्थित पाहिजे
अंबाबाई मंदिरातील भाविकांच्या भावना


ग्राऊंड रिपोर्ट...

अंबाबाईच्या दर्शनाला
अडचणींची रांग

भाविकांचा हिरमोड; पुरेशा मूलभूत सुविधा मिळणार कधी?

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः कडक उन्हाळ्यात आग ओकणारा सूर्य, गाडी पार्किंगसाठी न मिळणारी जागा, पार्किंग मिळाले तरी चालत जाऊन गाठावे लागणारे मंदिर आणि मंदिरात जाण्यापूर्वी पायाला बसणारे चटके अशा अडचणींशी सामना करत पर्यटक, भाविक अंबाबाई मंदिरात पोचतात. दर्शनरांगेत उभे राहतानाच पुरुष आणि महिलांची वेगळी रांग करावी लागते. यात आई, मुलगी एकीकडे आणि मुलगा, वडील दुसरीकडे अशी विभागणी होते. दर्शन झाल्यानंतर चुकामूक होते. फोन करून एकमेकांना शोधण्याशिवाय पर्याय नसतो. एवढे करूनही दर्शन लांबूनच घ्यावे लागते. ढकलाढकलीत देवीचे मुखही नजरेत भरत नाही. कोल्हापूरला येऊन देवीचे मनोभावे दर्शन घेण्याची इच्छा असताना मनस्तापालाच सामोरे जावे लागते, अशी भावना शनिवारी बाहेरगावच्या पर्यटकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मांडव घातला आहे. मात्र उन्हाळी सुटीमध्ये पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या दारातही मांडव घातला पाहिजे, अशी मागणी पर्यटकांनी केली. सध्या पागा बिल्डिंगमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र ती अपुरी आहेत. भाविकांची संख्या लाखांत आणि स्वच्छतागृहे दोनच, अशी परिस्थिती आहे. स्वच्छतागृह वापरण्यासाठी अक्षरशः रांग लागते. आहेत ती स्वच्छतागृहेही अस्वच्छ असतात. वयस्कर महिला असतील तर अर्धा तास प्रतीक्षा कशी करणार, असा संतप्त सवालच एका आजींनी विचारला.

96198
पार्किंग सुविधा सक्षम हवी
अंबाबाई मंदिराच्या परिसराच्या जवळपासच पार्किंगची सुविधा हवी. आम्हाला दसरा चौकात गाडी पार्किंग करून यावे लागले. दसरा चौकातून मंदिरापर्यंत ॲटो रिक्षा केली. आम्ही १२ जण होतो, तीन रिक्षा कराव्या लागल्या. आर्थिक भुर्दंड तर बसलाच आणि गैरसोयही झाली.
- प्रमोद सोनटक्के, सातारा

96200
तिन्ही भाषांत दिशादर्शक फलक हवेत
आम्ही अमराठी आहोत. शहरात आल्यापासून आमची भाषा कोणाला कळत नाही आणि त्यांची भाषा आम्हाला कळत नाही. अंबाबाई शक्तिपीठ असल्यामुळे दर्शनासाठी आलो. परराज्य, परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या माहितीसाठी मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांत माहिती व दिशादर्शक फलक असावेत.
- मुरली व हेमलता, हैद्राबाद

96202
परिसर स्वच्छ हवा
महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतातील मंदिरे पाहता सर्वत्र स्वच्छता दिसते. तिरूपतीनंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. येथे आल्यानंतर निराशा होते. परिसर स्वच्छतेसोबतच स्वच्छतागृहे, पाण्याची मुबलक व्यवस्था असली पाहिजे. महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधाही इतर देवस्थानांप्रमाणे केली पाहिजे. प्राथमिक सुविधाही मंदिर आवारात नाहीत, याची खंत वाटते.
- लक्ष्मी पाटील, इचलकरंजी

96203
दर्शनच नीट होत नाही
आम्ही दरवर्षी कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येतो. गतवर्षीपर्यंत पितळी उंबऱ्यापासून आतमध्ये जाऊन दर्शन घेता येत होते. सध्या लांबूनच दर्शन घ्यावे लागले. दर्शनच मिळणार नसेल तर कोल्हापूरला का यायचे? व्हीआयपी दर्शन तर आमच्यासमोर अनेकजणांनी घेतले. एवढ्या लांबून येऊन दर्शन मिळणार नसेल आणि काही जणांना आरामात दर्शन, असा दुजाभाव भाविकांमध्ये का?
- भारती महाडिक, पुणे

स्वच्छतागृहांची संख्या वाढवा
पंढरपुरात कितीही भाविक आले तरी त्यांच्यासाठी राहण्याची मोफत सुविधा आहे. कोल्हापुरात तशी सुविधा नाही. भाविकांना राहायचे असेल तर पैसे मोजावे लागतात. असुविधांना सामोरे जावे लागते. स्वच्छतागृहे आहेत मात्र संख्या वाढवली पाहिजे. दोनच स्वच्छतागृहांमध्ये जाण्यासाठी महिलांची मोठी रांग लागते. पाऊण तासानंतर नंबर आला. तेथेही स्वच्छता नव्हती, पाणीही मुबलक प्रमाणात हवे.
- सुनीता पोरे, पंढरपूर

निवास व्यवस्था हवी
राहण्याची मोफत सुविधा नाही म्हणून आम्ही आज जोतिबाचा नवस फेडून अंबाबाईचे दर्शन घेऊन माघारी जात आहोत. निवास, महाप्रसादाची सुविधा असती तर नक्कीच राहिलो असतो. कोल्हापूरसह परिसरातील आणखी पर्यटनस्थळे पाहता आली असती.
- सुधीर घाटगे, अकलूज
--------
पर्यटकांना हव्यात या सुविधा
- पिण्याच्या पाण्याची सोय
- स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी
- व्हीआयपी दर्शन नकोच
- दर्शन जवळून घेता यावे
- मंदिराजवळच पार्किंग किंवा पार्किंगपासूनच शटल सेवा
- ज्येष्ठांसाठी वेगळी दर्शन रांग
- महिलांसाठी हिरकणी कक्ष
- स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी
मंदिराची माहिती, अन्नछत्र यांचे माहिती फलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com