‘सोमलिंग’चा आशिर्वाद हवा, मग रस्ता नको का भावा ?

‘सोमलिंग’चा आशिर्वाद हवा, मग रस्ता नको का भावा ?

gad306.jpg
99609
माद्याळ : दुंडगे ते माद्याळच्या श्री सोमलिंग देवस्थानाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याची खड्डयांमुळे अशी दुरवस्था झाली आहे.
----------------------------------------------------
‘सोमलिंग’चा आशिर्वाद हवा,
मग रस्ता नको का भावा ?
ग्रामस्थांचा सवाल : दुंडगे-माद्याळ रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : कोणतीही सार्वत्रिक निवडणूक असो. प्रचार प्रारंभ किंवा तत्पूर्वी माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील सोमलिंग देवस्थानमध्ये नारळ ठेवून विजयासाठी आशिर्वाद घेणाऱ्‍या सर्वच लोकप्रतिनिधींचे या गावात जाणाऱ्‍या मुख्य रस्त्याकडेच दुर्लक्ष झाले आहे. वेळोवेळी मागणी करुनही रस्त्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने सोमलिंगाचा आशिर्वाद हवा, मग रस्ता का नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.
माद्याळच्या सोमलिंग देवाच्या दर्शनासाठी दर सोमवारी आणि श्रावणात मोठी गर्दी असते. तसेच कोणतीही निवडणूक आली की, लोकप्रतिनिधींना हा देव आठवतो. प्रचाराचा प्रारंभ या देवाला नारळ ठेवूनच केला जातो. जिल्हास्तरावरील नेतेसुद्धा या देवाच्या चरणी लीन होतात. दरम्यान ज्या देवाचा आशिर्वाद घेवून लोकप्रतिनिधी विजयी पथावर चालत असतात, त्यांनाच या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे. निवडणुका आल्या की रस्त्याचे आश्‍वासन द्यायचे, त्यानंतर सोयीस्कर दुर्लक्ष करायचे हे लोकांना आता तोंडपाठ झाले आहे.
मध्यंतरी माद्याळमध्ये खासदार व दोन आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यावेळी श्री सोमलिंग देवाला नारळ ठेवायला आपण येता, परंतु या मंदिरापर्यंत येणाऱ्‍या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी काही गावकऱ्‍यांनी भाषणातून केली. त्यावर सर्वच नेत्यांनी रस्त्याची पूर्तता करण्याची ग्वाही दिली. परंतु पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप यासाठी निधीच्या तरतुदीचा पत्ता नाही. माद्याळकरांना गडहिंग्लज व कर्नाटकात जाण्यासाठी हा सोपा मार्ग आहे. वाहतूकही अधिक आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. किमान, ज्याचा आशिर्वाद घेतला जातो त्या श्री सोमलिंग देवस्थानकडे तरी पाहून या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी अपेक्षा माद्याळकरांची आहे.
----------------
* गटबाजीची अडचण ?
गावात राष्ट्रवादीत दोन गट आहेत. ग्रामपंचायतीवर एका गटाची सत्ता आहे, तर दुसरा गट सत्तेपासून दूर आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोड्या करीत असतात. परिणामी गावच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे. लोकप्रतिनिधींनी आता या गटबाजीला महत्व न देता ग्रामस्थांचे होणारे हाल आणि जागृत देवस्थानला येणाऱ्‍या भाविकांचा विचार करुन या रस्त्याला निधीच्या तरतुदीची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com