गडहिंग्लजला कंरजीची आवक सुरू

गडहिंग्लजला कंरजीची आवक सुरू

01132
गडहिंग्लज : आठवडा बाजारात कंरजीची आवक सुरू झाली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

कोंथिबीर, पालेभाज्या तेजीत
आले, लसूणही वधारले; करंजीची आवक सुरू, कांद्याची प्रत खालावली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : येथील आठवडा बाजारात कंरजीची आवक सुरू झाली आहे. आले, लसणाचे भाव वधारले आहेत. कांद्याची अवकाळी पावसाने प्रत घसरल्याने दर कमीच आहेत. भाजी मंडईत कोंथिबीर, पालेभाज्या यांच्या दरातील तेजी टिकून आहे. गवार, ढब्बू, बिन्स यांचे दर चढेच आहेत. फळबाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. जनावरांचा बाजारात स्थानिक यात्रांमुळे बकऱ्यांना मागणी कायम आहे.
गेल्या आठवड्यापासून करंजी बाजारात दाखल झाली आहे. शेतीच्या बांधावर असणारी करंजी शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देते. तेल आणि रंग तयार करण्यासाठी करंजी वापरली जाते. किलोचा ३० ते ३५ रुपये असा दर आहे. जूनपर्यंत ही आवक सुरू राहते. कमी आवकेने आल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किलोमागे चाळीस रुपयांनी दर वाढला आहे. किलोचा १६० रुपये असा दर आहे. लसणाच्या क्विंटलचा भाव चारशे रुपयांनी वधारला आहे. किलोचा ५० ते १२० रुपये असा दर आहे. मराठवाडा, विदर्भातील अवकाळी पावसाने तेथून येणाऱ्या कांद्याची प्रत घसरल्याचे विक्रेते सिद्राम नेवडे यांनी सांगितले. स्थानिक सोलापूरची कांद्याला चांगला दर मिळाला. किलोला १० ते १५ रुपये असा कांद्याचा दर आहे.
भाजीमंडईत ओल्या भुईमुगाची आवक सुरू झाली आहे. किलोचा प्रतीनुसार ६० ते ७० रुपये किलो दर आहे. शेवगा पुन्हा वाढला आहे. गवार, बिन्सची दरातील सेंच्युरी कायम आहे. कोबी, टोमॅटो, फ्लावर, वांगी यांचे दर कमी असल्याने महागाईत सामान्यांचा दिलासा टिकून आहे. मात्र, पालेभाज्या, कोथिंबीर, लिंबू यांचे दर वाढलेले आहेत. पेंडीचा पंधरा ते वीस रुपये दर आहे. फळबाजारात कोकणच्या हापूस आंब्याची आवक थोडी वाढली असली तरी दरात फारसा फरक नाही. ४०० ते ६०० रुपये डझन असा दर आहे. पेरू, माल्टा, डाळींब ८० ते १०० रुपये किलो आहेत. जनावरांच्या बाजारात म्हशी, बैलांची आवक तुलनेने कमी आहे. मात्र, यात्रांमुळे बकऱ्याची पंधरावड्यापासून वाढलेली मागणी कायम आहे. दहा ते वीस हजारांपर्यंत दर आहेत.
-------------
चौकट...
उन्हाने बदलली वेळ
गेल्या महिन्याभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. परिणामी, आठवडा बाजारात दुपारी एक ते सायंकाळी चारपर्यंत ग्राहकांनी जणू अघोषित बंद पुकारल्याचे चित्र आहे. विक्रेतेही ताडपत्रीचा निवारा बांधून ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून राहतात. बाजाराच्या मार्गावर ताडपत्रीचे जणू आच्छादन पसरलेले जाते. नेहमी दुपारच्या सत्रातच भर बाजार भरतो, पण वाढत्या उन्हाने जणू आठवडा बाजाराची वेळच बदलून टाकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com