गायरान समृध्द जिल्हा

गायरान समृध्द जिल्हा

जिल्ह्यात २३ हजार हेक्टर गायरान
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : जिल्ह्यात गायरानवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. अनेक गावांना याबद्दल नोटिसाही दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा हा गायरानने समृद्ध आहे. जिल्ह्यात तब्बल २३ हजार ५३२ हेक्टर गायरान असून, सर्वाधिक गायरान जमीन शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, करवीर आणि भुदरगड तालुक्यात आहे. कागदापत्री गायरान समृद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिक्रमित जमिनी किती याचा शोध घ्यावा लागेल.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी पाच टक्के जमीन गायरान क्षेत्र म्हणून असावी, असा नियम आहे. गायरान जमिनीवर शासनाची मालकी असते. पण, सार्वजनिक उपयोगासाठी अशी गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असते.
त्यामुळे ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनींच्या सातबाऱ्यावर ‘शासन’ असाच उल्लेख ठेवावा लागतो आणि इतर अधिकार या स्तंभातच संबंधित ग्रामपंचायतीचं नाव असतं. गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी, वनासाठी, राखीव जळणासाठी, गावातील जनावरांसाठी मोफत कुरण, राखीव गवतासाठी, वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, मळणीसाठी, बाजारासाठी, कातडी कमावण्यासाठी, रस्ते, बोळ, उद्याने, गटारे यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळे ठेवणे हे कायदेशीर असेल आणि या जमिनींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय उपयोगात आणले जात नाही. जिल्ह्यात अशी २३ हजार ५३२ हेक्टर जमीन शिल्लक आहे.
शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक दोन हजार ९५४ हेक्टर गायरान जमीन आहे. त्यानंतर, पन्हाळा तालुक्यात एक हजार ६१५ हेक्टर, करवीर तालुक्यात एक हजार ४८७ हेक्टर, हातकणंगले तालुक्यात एक हजार ३७४ हेक्टर गायरान जमीन आहे; तर सर्वांत कमी ३४० हेक्टर जमीन इचलकरंजीत आहे. शासनाच्या नियम-अटींचा विचार न करता अशा जमिनी ग्रामपंचायत सदस्यांच्या मर्जीने वाटप केल्याचे चित्र आहे. अनेकांनी अशा जमिनीवर पिके घेण्यास सुरुवात केली आहे. जनावरांसाठी खासगी गोठे, गॅरेज, घरे, मोटारींसाठी शेड बांधली आहेत. अशा जमिनींचा शोध सुरू झाला आहे.
....
चौकट
जिल्ह्यात कागदोपत्री असणारी तालुकानिहाय गायरान जमीन (हेक्टरमध्ये)
करवीर* १,४८७.८०
गगनबावडा*७४१
पन्हाळा*१,६१५
शाहूवाडी*२,९५४
हातकणंगले*१,३७४
इचलकरंजी*३४०
शिरोळ*८५७
राधानगरी*१,३८८
कागल*९३३
भुदरगड*१,५५७
आजरा*२,९२१
गडहिंग्लज*९८७
चंदगड* ६,३७२
एकूण क्षेत्र* २३,५३२

चौकट
या गावात सर्वाधिक गायरान जमीन
सांगरुळ (९३ हेक्टर), मुडशिंगी (२२ ते २३ हेक्टर), आडूर (२४ हेक्टर), उपवडे (१८६ हेक्टर), विकासवाडी (८२ हेक्टर), तेरसवाडी (७६ हेक्टर), माजगाव (२३ हेक्टर), कसबा ठाणे (५८ हेक्टर), टोप (३० हेक्टर), आवळी खुर्द (२५ हेक्टर), नरतेवडे (३८ हेक्टर), भडगाव (५७ हेक्टर) आणि माद्याळ-कागनूल (११९ हेक्टर).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com