ऊस वाहतूकदारांची फसवणूक

ऊस वाहतूकदारांची फसवणूक

ऊसतोड मुकादमांकडून कोट्यवधींची फसवणूक

जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखलः


कोल्हापूर, ता. १९ः ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अ‍ॅडव्हान्स घेवून ऊसतोडीसाठी टोळ्या न पाठविता मुकादमांनी फसवणूक केल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी फिर्यादी दाखल करण्यात आल्या. यामध्ये मुकादमांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
....
शिरोळ तालुक्यात शंभर कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज

शिरोळ ः तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. तालुक्यातील वाहनधारकांची, सुमारे शंभर कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज असून मुकादमांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील, स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यांमध्ये रितसर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर या तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याकरीता स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी कागदपत्रांची जुळवाजवळ करून गुन्हे दाखल करीत आहेत.

....
गडहिंग्लजला ६५ जणांची चार कोटींवर फसवणूक

गडहिंग्लज : ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अ‍ॅडव्हान्स घेवून ऊसतोडीसाठी टोळ्या न पाठविता मुकादमांनी फसवणूक केल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केलेल्या आवाहनानुसार आज येथील पोलिसात ६५ जणांनी फिर्याद दिली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखलची कार्यवाही सुरु होती. यामध्ये ४ ते ५ कोटींच्या फसवणुकीचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
....
गारगोटीत पाच मुकादमांविरोधात गुन्हा

गारगोटी : ऊस तोडणी मुकादमांनी भुदरगड तालुक्यातील ऊस वाहतूकदारांची सुमारे २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. पाच ऊस तोडणी मुकादमांवर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
वासनोली येथील मानसिंग पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत पिंपळगाव काजळे तांडा (जि. परभणी) येथील बिबीशन सखाराम चव्हाण याला ६ लाख रुपये ऊस तोडणी मजूर आणण्यासाठी दिले होते. गंगापूर येथील संजय विष्णू जाधव यांनी गुर्हाळ घरासाठी ऊस तोडणी मजूर आणण्याकरिता जाहगीरमोहा (जि. बीड) येथील मुकादम संतोष अनुरथ मंत्रै याला ५ लाख ४० हजार रुपये १० फेब्रुवारी २०१७ रोजी दिले होते. कोळवण येथील रामचंद्र गोविंद गुरव या शेतकऱ्याने कवडा (जि. परभणी) येथील मुकादम विजय साहेबराव चव्हाण यास ५ लाख ६० हजार रुपये दिले होते.
....
इचलकरंजीत चार फिर्यादी दाखल

इचलकरंजी : येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ४ फिर्यादी दाखल झाल्या. यातून चौघांची तब्बल ३६ लाख ८० हजारांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोपट वसंत सातपुते (वय २९, रा. गौडवाडी, ता.सांगोला), बाबासाहेब बबन वरपे (वय ३२,रा. कोरडेवाडी, ता. केज, जि. बीड), सौरभ भरत कांबळे (वय २१,रा. नंदेश्‍वर, ता.मंगळवेढा, जि. सोलापूर), संजय गोवर्धन राठोड (वय ३५, रा. पोस्ट नाळवंडी, ता. बीड), विठ्ठल नागु मिरठकर, विश्‍वनाथ नागोजी मिरठकर (दोघे रा. पातोंडा, जि. हिंगोली) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
...
पेठवडगावमध्ये अडीच कोटींच्या फसवणुकीची तक्रार

पेठवडगाव: फसवणूक करणाऱ्या तीस ऊस तोडणी मुकादामावर वडगाव पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. या मुकादमांनी सुमारे दोन कोटी ५५ लाखांचा गंडा घातल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अणखी आठ ते दहा ऊस तोडणी मालक तक्रार देणार आहेत.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे सुरू होते.
....
आजऱ्यात ३५ वाहनमालकांना गंडा

आजरा ः तालुक्यातील वाहतूकदार व वाहनमालकांची ऊसतोड मुकादम, मजूर पुरविणारे यांनी १ कोटी ६७ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ३५ जणांनी याबाबत आजरा पोलिसात तक्रार दिली आहे. यातील तीन आर्थिक व्यवहार हे आजरा परिसरात झाले असून अन्य व्यवहार हे जिल्ह्याबाहेर झाले आहेत.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com