मांजरांना गंभीर आजाराची लागन

मांजरांना गंभीर आजाराची लागन

मांजरांना आजाराची लागण
वेळीच काळजी घ्यावी; उपचाराला घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : निशा काकू स्वयंपाक करू लागल्या की, त्यांच्या घरातील गोजीरवाणी माऊ (मांजर) ‘मिंयांव, मिंयांव’ असा लयदार मंजूळ आवाज काढत त्यांच्या पायात घुटमळत राहायची. तशी काकूच्या लगबगीला माऊच्या हालचालींची साथ लाभायची. वर्षानुवर्षे घरातल्यांच्या पायात माऊचं रेंगाळणं, घरभर बागडणं, कोणालाही बिलगून बसणं, आत जा म्हटले की, मिंयांव करून फणकाऱ्याने आत निघून जाणं... अशा लडीवाळ हालचालींनी घर प्रसन्न ठेवणाऱ्या माऊने गेले पाच दिवस अन्न- पाणी सोडलं... काकूंसह त्यांच्या लेकींसह नातवंडंही हवालदिल झाली. ही एका घरातील घटना असली तरी सध्या मांजरांना ‘फेलाईन पॅन ल्युकेपेनिया’ आजार होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणातून पुढे येत आहे.
याबाबत घटना अशी- ‘त्या’ घरातील मांजराने पहिल्या दिवशी उलटी केली. ‘माऊ बाहेरून काहीतरी खाऊन आली असेल, अपचनामुळे उलटी झाली असेल, कशाला सीरियस घेतेस’ असे म्हणत लेकीने काकूला गप्प बसवलं. पहिले दोन दिवस काकू मांजरावर लक्ष ठेवून होत्या. मांजराला उलटी प्रतिबंधक औषध दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मांजर थंड जागा शोधून तिथेच बसू लागली. थोडा ताप आला. धाप लागू लागली. चौथ्या दिवशी उलटी व धाप वाढली. शौचास लागले. मग मांजराला मंगळवार पेठेतील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केली. त्याला ‘फेलाईन पॅन ल्युकेपेनिया’ हा आजार झाल्याचे निदान झाले. गेल्या काही महिन्यांपासून घराघरांतील अनेक मांजरांना असा आजार होत असून अशी मांजरे दवाखान्यात उपचाराला येत आहेत. ज्यांचे उपचाराकडे दुर्लक्ष होते त्या मांजरांचा मृत्यू होतोय, अशी माहिती पशु पर्यवेक्षक डॉ. सॅम लुड्रीक यांनी दिली. या घटनेतील मांजराच्या अंगातील पाणी कमी झाल्याने मांजर पेंगाळून गेले. रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या. यकृत, किडणीवर परिणाम झाला होता. वेळीच उपचार न झाल्यास पुढे कावीळ झाली तेव्हा मांजर जगण्‍याची शक्यता मावळली, असे पशुवैद्यकांनी सांगितले.
------------------
पशु पर्यवेक्षकांनी आजाराविषयी दिलेली माहिती अशी-
- मांजरांना होणारे फेलाईन पॅन ल्युकेपेनिया व पॅरोटोनायटीस आजार एकमेकांशी संबंधित आहेत
- मांजराच्या छातीत, पोटात पाणी कमी होते. श्‍वास घेताना त्रास होतो
- डोळ्यांतून सतत पाणी येते. डोळे लाल होतात
- मांजरापासून माणसांना रोग होत नाही; परंतु एका मांजराचा दुसऱ्या मांजरास संसर्ग होतो
- मांजराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास त्याला आजार होत नाही
---------------
उपाय असे करावेत
- मांजरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे
- जंताचे औषध नियमित द्यावे. सकस आहार द्यावा. इतर मांजरांना आपल्या मांजराच्या संपर्कात येऊ न देणे
- पहिल्यांदा उलटी केल्यास त्वरित उपचार करावेत
- रेबीस प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com