परवाना विभाग कारवाई

परवाना विभाग कारवाई

विनापरवाना २० दुकाने,
गोडावूनला नोटीस
परवाना विभागाकडून कारवाई सुरू
कोल्हापूर, ता. २५ : शिवाजी रोडवर लागलेल्या आगीनंतर महापालिकेच्या परवाना विभागाने आज कारवाईला सुरूवात केली. दाटवस्तीतील बाजारगेटमधील परवाना नसलेल्या २० दुकाने व गोडावूनला नोटीस दिल्या आहेत. तसेच बाजारगेट, शिवाजी रोडवरील १०० दुकानांची तपासणी केली आहे. पाच कर्मचाऱ्यांचे पथक काम करत असून कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.
दाटवस्तीतील दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे गोडावून केली आहेत. अनेक दुकानांचा परवाना वेगळा व व्यवसाय वेगळाच सुरू आहे. अनेक इमारतींवर पत्र्यांची शेड मारून मालाची साठवणूक केली जात आहे. किरकोळ विक्रीची दुकाने असताना त्यात लाखोंचा माल साठवून ठेवला जात आहे. त्यातूनच शिवाजी रोडवरील आगीची व्याप्ती वाढली. इतर इमारतींनाही धोका निर्माण झाला. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विभागांना तपासणी व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार परवाना विभागाकडून आज कारवाईला सुरूवातही केली. पाच कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून आज बाजारगेट, शिवाजी रोड, बिंदू चौक परिसरातील दुकानांची पाहणी सुरू केली.
परवाना तपासण्याबरोबरच त्यानुसार दुकानातील साठाही तपासला जात आहे. ज्यांच्याकडे परवाना नाही, अशांना सात दिवसात परवाना घेण्याची नोटीस दिली आहे. बाजारगेट परिसरात अशा २० दुकाने व गोडावूनना आज नोटीस दिली. याबरोबरच शिवाजी रोड व बिंदू चौक परिसरातील कटलरी, प्लास्टिक, खेळणी, पुस्तके तसेच अन्य साहित्यांच्या दुकानांचीही तपासणी करण्यात आली. परवाना अधीक्षक राम काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
---------------
चौकट
नगररचना विभागाला अहवाल देणार
पालिकेच्या परिसरात अनेक इमारतींवर पत्र्याची शेड उभे करून बेकायदेशीर गोडावून बांधलेली आहेत. त्यात माल साठवणूक केली आहे. अशा इमारतींमधील दुकानांची तपासणी करून वाढीव गोडावूनचा अहवाल परवाना विभागाकडून नगररचना विभागाकडे दिला जाणार आहे. त्यानुसार बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com