सामान्यांना न्याय हीच कार्यशैली

सामान्यांना न्याय हीच कार्यशैली

5218
कोल्हापूर ः नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी मावळते जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

सामान्यांना न्याय हीच कार्यशैली
---
महेंद्र पंडित; जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः सर्वसामान्यांना न्याय हीच कार्यशैली असेल, असे मत नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज व्यक्त केले. त्यांनी मावळते पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदावरून त्यांची येथे बदली झाली आहे. बलकवडे यांची बदली पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल येथे गट क्रमांक एकमध्ये समादेशक म्हणून नियुक्ती झाली.
पंडित मूळचे सिन्नर (जि. नाशिक) येथील असून, २०१३ च्या यूपीएससी तुकडीतील आहेत. ते अधीक्षक कार्यालयात आल्यावर बलकवडे यांनी त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारल्यावर ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची नगरी असून, पुरोगामी शहर आहे. यापूर्वीचे येथील अधीक्षक अभिनव देशमुख आणि बलकवडे यांच्याबरोबर गडचिरोली येथे काम केले. त्यामुळे त्यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम यापुढेही सुरू राहतील. सर्वसामान्य व्यक्ती शेवटची पायरी म्हणून पोलिस ठाण्यात येते. तेथे त्याला न्याय मिळाला पाहिजे, असे काम असेल. ज्या ठिकाणी दखल पात्र गुन्हा आहे, त्याठिकाणी तो नोंद होईल. अदखलपात्र असेल तर त्याचीही नोंद घेतली जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पोलिस असतील. कर्मचाऱ्यांसाठी वेल्फेअरच्या माध्यमातून अधिक मदत देण्यासाठी प्रयत्न राहील. कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेबाबत मी स्वतः फिरून पुढील निर्णय घेईन.’’
ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या बदल्या कायद्यानुसारच होतील. दोन राज्यांच्या सीमा भागात होणारी तस्करी रोखण्यासाठी अन्य काही नवीन उपाययोजना केल्या जातील. स्थानिकांकडून माहिती घेऊन पुढील निर्णय घेतले जातील.’’
या वेळी बलकवडे यांनी ‘कोल्हापूर लयभारी’ अशी भावना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर स्वयंभू आहे. येथील लोक प्रेमळ आहेत. त्यांचे पोलिसांना सहकार्य असते. केलेल्या कामाबद्दल समाधानी आहे.’’
या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खाटमोडे, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अन्नपूर्ण सिंग यांच्‍यासह पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com