पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

नवीन गंठण करून देण्याच्या
निमित्ताने साडेसहा तोळ्यांची फसवणूक

गुजरीतील एकावर गुन्हा दाखल

कोल्हापूर, ता. २९ः नवीन गंठण करून देतो, असे सांगून सुमारे साडेसहा तोळ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरीतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हरिदास निमाई पात्रा (रा.महादेव गल्ली, सावित्री प्लाझा, गुजरी, मूळ.रा.मिदनापूर,पश्‍चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली दुमाला येथील वैभव रामचंद्र पाटील यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची आई नंदा रामचंद्र पाटील यांचे ५४ ग्रॅम ९०० मिली वजनाचे सोन्याचे गंठण होते. तसेच एक तोळा वजनाचा वळा असे मिळून ६४ ग्रॅम ९०० मिली वजनाचे सोन्याचे नवीन गंठण तयार करण्याचे ठरले होते. त्यानुसार संशयित आरोपीला ओळखीने २० एप्रिल २०२३ रोजी ते दिले होते. त्याने २८ मे पर्यंत नवीन गंठण दिले नाही. त्याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर वैभव यांनी ६४ ग्रॅम ९०० मिली सोन्‍याची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ लाख ४१ हजार ९४८ रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. बाजारभावानुसार याची किंमत अधिक होते. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------

धमकीप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूरः घरासमोरील गाडीवर दगड मारून मुलग्याला धमकी दिल्याची फिर्याद विजय मोहन नागावकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. २७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सदरबाजार येथे ही घटना घडली. याबाबत नागावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी नकुल जाधव (रा.कावळा नाका), सौरभ काळू कोळी, पियुष पवार, आदर्श गायकवाड (सर्व रा. सदरबाजार) यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी नागावकर यांच्या घरासमोरील गाडीवर कोणीतरी दगड मारत असल्याचे दिसले. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता संशयित आरोपी घरासमोर जोरजोरात ओरडत होते. फिर्यादींचा मुलगा प्रतिक कुठे आहे, त्याला बाहेर बोलवा, त्याला सोडणार नाही, अशी धमकी देत होते. नागावकर यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करून संशयित आरोपी पियुष पवार याने हातातील रॉडने कोपराजवळ मारून जखमी केले. दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---
मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूरः बालाजी पार्क येथील थांब्यावर संशयित आरोपींनी कामाचे पैसे आताच्या आता दे, असे म्हणून सानेगुरुजी वसाहत येथील अंकुश रमेश देशपांडे यांना मारहाण केली. देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी ज्ञानेश्‍वर तुकाराम सगर, पांडुरंग तुकाराम सगर (दोघे रा.सानेगुरुजी वसाहत) आणि त्यांचे दोन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. फिर्यादी देशपांडे हे झाडाची फांदी मारल्यामुळे जखमी झाले असून त्यांच्या उजव्या पायावर व तोंडावर मार लागला आहे. दरम्यान, चौघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com