
केडीसी बातमी
बचतगटांना कमी व्याज दरात कर्जपुरवठा
जिल्हा बँकेचा निर्णय ः दीनदयाल अंत्योदय योजनेत विनातारण सात टक्के व्याज
कोल्हापूर, ता. ३० ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविणार आहे. या अभियानांतर्गत बँक महिला बचतगटांना सात टक्के इतक्या कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला.
नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही योजना बँक राबविणार आहे. जिल्ह्यातील महिलांना आर्थिक सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पात्र महिला बचतगटांना प्रत्येक गटाला पाच लाख रूपयांप्रमाणे कर्ज मंजुरीची मर्यादा आहे. यामध्ये प्रथम कर्जमर्यादा दीड लाख रुपये व परतफेडीची मुदत २४ महिने आहे. द्वितीय कर्जमर्यादा दीड ते तीन लाख रुपये व परतफेडीची मदत ३६ महिने आहे. तृतीय कर्जमर्यादा किमान पाच लाखापर्यंत आहे व परतफेडीची मुदत साठ महिने आहे. बचतगटांच्या उपक्रमाच्या स्वरूपावर खेळत्या भांडवली कर्जाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.
२००० साली बँकेने स्वतंत्र महिला विकास कक्ष सुरू केला असून त्या माध्यमातून सात लाखाहून अधिक महिला भगिनी बँकेशी जोडल्या गेलेल्या आहेत.