एसटीपी तपासणी संथ

एसटीपी तपासणी संथ

लोगो- महापालिका
---
एसटीपींची तपासणी संथच
दोन आठवड्यांत दोनच प्रकल्प; इतर कामांचा दबाव की वेळकाढूपणा?

कोल्हापूर, ता. ३० ः एकीकडे महापालिकेचे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यरत असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, दुसरीकडे गृहनिर्माण संस्था, हॉस्पिटल व हॉटेल यांनी राबवलेल्या ३९ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची स्थिती अजूनही गुलदस्त्यात आहे. ती जाणून घेण्यासाठी या प्रकल्पांची तपासणी करण्याचे महापालिकेने जाहीर केले; पण दोन आठवड्यांत दोन प्रकल्पांपुढे तपासणीची गाडीच पुढे गेलेली नाही. या संथ तपासणीमागे खरोखरच इतर कामांचा दबाव आहे की वेळकाढूपणा करून बंद असलेल्या प्रकल्पांसाठी वेळ दिला जात आहे याची शंका येत आहे.
नवीन नियमावलीनुसार शहरामध्ये बांधकाम परवानगी देताना नगररचना विभागामार्फत गृहनिर्माण संस्था, हॉस्पिटल, हॉटेल यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवून तो कार्यान्वित ठेवण्याची अट असते. सध्या काही गृहनिर्माण संस्था, हॉस्पिटल व हॉटेल यांचे प्रकल्प कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे तेथील सांडपाणी तिथेच प्रक्रिया करून वापरले जावे हा उद्देशच फसला आहे. परिणामी ते सांडपाणी गटारी, नाल्यातून जात एकतर महापालिकेच्या प्रकल्पाकडे नेले जाते किंवा जेथील सांडपाणी महापालिकेच्या एसटीपीला जोडलेले नाही, ते थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याची स्थिती होती. त्यासाठी महापालिकेने १२ मेपासून दोन दिवसांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असल्याचे पर्यावरण विभाग व नगररचना विभाग संयुक्त पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. ज्यांचे प्रकल्प बंद असेल, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
ही कारवाई करण्यासाठी प्रथम तपासणी पूर्ण होण्याची गरज होती. दोन आठवड्यांत केवळ दोन प्रकल्प तपासल्याचे समजते. बैठक, फिरतीबरोबर कार्यालयातील कामामुळे वेळ नसल्याने टप्प्याटप्प्याने ती तपासणी केली जात आहे. मात्र, दोन दिवसांचा अवधी दिला असताना दोन आठवडे झाले तरी ही तपासणी गती घेत नसल्याचे त्याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. एकूण ३९ प्रकल्पांपैकी ई वॉर्डमध्ये जास्त प्रकल्प आहेत. नगररचना विभाग व पर्यावरण विभागाने संयुक्त काम करणे आवश्‍यक असताना तसे होताना दिसत नाही.
....
इतर प्रकल्पांबाबत सतर्कता का नाही?
मैलामिश्रित सांडपाण्यावर दुधाळी व‍ कसबा बावडा येथील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एसटीपीमध्ये प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले सांडपाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषाप्रमाणे नदीकडे सोडण्‍याच्या योग्यतेचे असल्याचे महापालिकेचे मत आहे. मग शहरातील इतर खासगी प्रकल्पांबाबत महापालिका स्वतःहून तपासणीचे नियोजन का करत नाही हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
....
कोट
कोर्टातील निकालानुसार प्रकल्पांची तपासणीची जबाबदारी पर्यावरण अधिकाऱ्याची आहे. त्यावर त्यांच्याकडून सातत्याने निगराणी होणे अपेक्षित आहे; पण पर्यावरण विभागाकडून हेतुः दुर्लक्ष होत आहे. तसेच, या प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी वापरले पाहिजे. तरच महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण कमी होईल.
ः- उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com