दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात द्वीतीय स्थानी

दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात द्वीतीय स्थानी

दहावीत मुलींची आघाडी कायम; विभागात कोल्हापूर जिल्हा प्रथम

कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ तत्त्वानुसार जाहीर झालेल्या या निकालात सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय स्थान मिळविले (९६.७३ टक्के). या विभागात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक (९७.२१ टक्के) पटकविला. सातारा जिल्हा द्वितीय (९६.७२ टक्के); तर सांगली जिल्हा (९६.०८ टक्के) तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा २.२८ टक्क्यांनी अधिक आहे. विभागाचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १.७७ टक्क्यांनी घटला आहे.
कोल्हापूर विभागाची निकालाची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष महेश चोथे आणि सचिव डी. एस. पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २३१६ माध्यमिक शाळांतून १२८९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२८५०३ जणांनी परीक्षा दिली. त्यातील १२४३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९६.७३ इतकी आहे. यावर्षी ६६४९६ मुले उत्तीर्ण झाल्या असून, त्यांची टक्केवारी ९६.६९ इतकी आहे. ५७८१६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याची एकत्रित टक्केवारी ९७.९७ आहे. परीक्षेत गैरमार्ग (कॉपी) प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात दोन आणि सांगली जिल्ह्यात तीन, असे एकूण पाच गैरमार्ग प्रकरणे सापडली होती. चौकशीअंती दोषी आढळलेल्या या विद्यार्थ्यांनी गैरमार्ग केलेल्या विषयाची संपादणूक रद्द केली असल्याचे चोथे यांनी सांगितले. यावेळी सांगलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. एम. लोंढे, साताराच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सहसचिव एस. बी. चव्हाण, एस. एस. कारंडे, एन. डी. पाटील, डी. पी. पोवार, एस. वाय. दुधगावकर उपस्थित होते.
.........................................................................................
दीपक पोवार यांच्या सूचना बोर्डाने स्वीकारल्या
कोल्हापूर विभागात वरिष्ठ अधीक्षकपदी दीपक पोवार कार्यरत आहेत. त्यांनी परीक्षेत कॉपी करण्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगितल्यास गैरमार्गाची प्रकरणे कमी होतील. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसोबतच मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावे, असे बोर्डाला सुचविले होते. या दोन्ही सूचना बोर्डाने स्वीकारल्या. त्यात बारावीच्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकसमवेत मायग्रेशन सर्टिफिकेट यावर्षीपासून मिळणार आहे. याबद्दल पोवार यांचा चोथे यांनी सत्कार केला.
.....................................................................................................
पेढे वाटप, गुलालाची उधळण
या निकालाची विद्यार्थी, पालकांना प्रतीक्षा लागून राहिली होती. दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल दिसू लागला. उत्तीर्ण झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत आनंदोत्सव साजरा केला. स्मार्टफोनच्या माध्यमातून विद्यार्थी, पालकांनी निकाल जाणून घेतला. पेढे, मिठाई वाटप केले. आपली गल्ली, कॉलनी, गावात काही उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली. काहींनी मोटारसायकल रॅली काढून आनंद व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव झाला.
.....................................................................................................................
कोट
कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली. त्याचा परिणाम यावर्षीच्या विभागाच्या निकालात १.७७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९८.५० टक्के लागला होता. मात्र, यावर्षी राज्याच्या पातळीवर कोल्हापूर विभागाचा निकाल चांगला लागला आहे.
- महेश चोथे, प्रभारी विभागीय अध्यक्ष
.................................................................................................
कोल्हापूर विभागाचा निकाल
जिल्हा* नोंदणी* प्रविष्ट* उत्तीर्ण
कोल्हापूर*५३००४*५२९२६*५१४५०
सांगली*३७९९९*३७७६६*३६२८८
सातारा*३७९३०*३७८११*३६५७४
..........................................................................
९८२ ‘रिपीटर’ उत्तीर्ण
कोल्हापूर विभागातील १६६० पुनःप्रविष्ट (रिपीटर) विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १६१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९८२ जण उत्तीर्ण झाले. त्यात कोल्हापूरमधील ३८७, सांगलीतील २५० आणि सातारा जिल्ह्यातील ३४५ विद्यार्थी आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ६०.७६ इतकी आहे.
..............................................................................................
विभागातील श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
प्रावीण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्के व पुढे)- ४९८१७
प्रथम श्रेणी (६० टक्के व पुढे)- ४४९४५
द्वितीय श्रेणी (४५ टक्के व पुढे)- २४१६६
उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्के व पुढे)- ५३८४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com