बलकवडे बदली

बलकवडे बदली

महापालिका प्रशासक
बलकवडेंची बदली
कोल्हापूर, ता. २ ः महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची आज पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालकपदी बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी अजून नवीन नेमणूक झालेली नाही, त्यामुळे प्रशासकपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. डॉ. बलकवडे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत पहिला एक महिना आयुक्त व नंतर प्रशासक म्हणून काम पाहिले.
महासंचालकपदावरील आर. एस. जगताप यांच्याकडून नवीन कार्यभार त्वरित स्वीकारावा. तसेच महापालिकेतील कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बलकवडेंच्या बदली आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्या लवकरच कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने प्रशासक बलकवडे यांची बदलीची शक्यता गेल्या आठवड्यापासून वर्तवण्यात येत होती.
बलकवडे यांची प्रथम आयुक्त म्हणून ऑक्टोबर २०२० मध्ये नियुक्ती झाली होती. १५ नोव्हेंबरला महापालिका सभागृहाची मुदत संपली. त्यामुळे त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर आजतागायत महापालिका निवडणूक झाली नसल्याने ती नेमणूक शासनाने कायम ठेवली होती. कोरोनाची लाट, २०२१ चा महापूर अशा मोठ्या आपत्तींच्या कालावधीत त्यांनी काम केले. त्यांनी घरफाळा उत्पन्न वाढीसाठी सवलतीची योजना राबवून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले. नागरिकांना महापालिकेच्या सुविधा घरबसल्या मिळाव्यात यासाठी ई-गव्हर्नन्ससारखा प्रकल्प पुन्हा सुरू केला. तसेच कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब सुरू केला. २०२१ मधील महापुराच्या फटक्यानंतर त्यांनी सलग दोन वर्षे नाले सफाईसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. पाणीपुरवठ्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी गळती दुरुस्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. थेट पाईपलाईनच्या कामाला गती दिली. त्यांच्या काळात सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवल्याने राज्यात महापालिकेचा तिसरा क्रमांक आला. आत्मनिर्भर भारत योजनेतील लाभार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. नगररचना विभागातील रखडणाऱ्या कामांवर मार्ग काढण्यासाठी विशेष शिबिर घेतले. तसेच तिथे जाऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. परवाना, घरफाळा विभागाचेही शिबिर घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com