आमदार आवाडे-हाळवणकरांचे सूर जुळणार?

आमदार आवाडे-हाळवणकरांचे सूर जुळणार?

आमदार आवाडे-हाळवणकरांचे सूर जुळणार?
दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसह इचलकरंजीतील राजकीय क्षेत्रात उत्सुकता
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ः आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे भविष्यात राजकीय सूर जुळणार काय, याबाबतची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत इचलकरंजीत झालेल्या व्यापारी मेळाव्यात आमदार आवाडे यांनी स्पष्टच शब्दात भूमिका मांडली. पुढील काळात इचलकरंजी महापालिका निवडणूक आहे. ती दोघांच्याही दृष्टीने महत्त्‍वाची असणार आहे. त्यामुळे आवाडे-हाळवणकर यांची दिलजमाई होणार काय, याबाबतची उत्सुकता दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राला असणार आहे.
वस्त्रनगरीतील राजकारणाची दिशा साधारणपणे दीड दशकापूर्वी बदलली. पूर्वीच्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला. हाळवणकर यांनी प्रथम विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर वस्त्रनगरीत नवा राजकीय संघर्ष सुरू झाला. तो अद्यापही संपलेला नाही. दोन टर्म आमदारकी मिळाल्यानंतर आवाडे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आवाडे यांनी विधानसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला. त्याला आता चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर सतत ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होत राहते. पण अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांनी भूमिका मांडताना स्थानिक पातळीवर आमच एकमत करा, अशी साद घातली. त्यांनी खुलेपणाने मांडलेली भूमिका भाजपच्या स्थानिक पातळीवर स्वीकारली जाणार काय याबाबत चर्चांना उधाण येत आहे.
भविष्यातही आपण भाजपसोबत राहणार असल्याची ग्वाही आमदार आवाडे यांनी जाहीरपणे दिली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचा विषय सहजपणे समोर येत आहे. काही महिन्यात महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. नविन महापालिका असल्यामुळे पहिला महापौर आपल्याच पक्षाचा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. प्राथमिक टप्प्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न हा महापालिका निवडणूकीत दिसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांची एकत्रीत ताकद आव्हान निर्माण करु शकते. त्यामुळे त्यांच्याविरोधात आवाडे - हाळवणकर गट एकत्र येणार काय, याची चर्चा सतत होत आहे. पण त्याबाबत अद्याप सकारात्मक पावले पडताना दिसत नाहीत. आवाडे यांची कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी असली तरी स्थानिक भाजपकडून मात्र अद्याप या संदर्भातील सकारात्मक भूमिका समोर आलेली नाही. अनेक इच्छुकांचे लक्ष या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेकडे आहे. भाजपसोबत गट्टी जमली नाही तर आवाडे ताराराणी पक्षाच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तशी त्यांनी प्राथमिक तयारी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ऐनवेळी आवाडे - हाळवणकर एकत्र येवून महापालिका निवडणूक लढवतील, असे राजकीय तज्‍ज्ञांचे मत आहे. एकूणच आमदार आवाडे यांच्या उघड भूमिकेनंतर त्यांचा पुढील काळात अधिकृतपणे भाजप प्रवेश होणार काय, आणि इचलकरंजी महापालिकेत आवाडे-हाळवणकर एकत्र येणार काय, या दोन राजकीय घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
-----------
हाळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
आमदार आवाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता लक्ष हाळवणकर यांच्या भूमिकेकडे असणार आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे अधिक लक्ष असणार आहे. कारण अनेक इच्छुकांची पुढील भूमिका या घडामोडीनंतरच ठरणार आहे. किंबहूना आवाडे - हाळवणकर युतीवरच विरोधकांचीही पुढची वाटचाल ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com