सामान्यांना दिलासा देणारा, विकसित भारताचे गाजर दाखविणारा अर्थसंकल्प

सामान्यांना दिलासा देणारा, विकसित भारताचे गाजर दाखविणारा अर्थसंकल्प

सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांचे टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः सामान्यांना दिलासा देणारा, विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा, देशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी मदत होणारा, अशा प्रतिक्रिया केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आज जिल्ह्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेते-पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. विकसित भारताचे गाजर दाखविणारा आणि अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची घोर निराशा सरकारने केली असल्याची टीका महाविकास आघाडी, भाकप आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
..............
कोट
गोरगरीब आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक निर्णयांची अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा अतिशय चांगला आणि योग्य ते पालन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये शिस्त आणलेली आहे. या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत आहोत.
- हसन मुश्रीफ, पालकमंत्री
.............
दोन कोटी लोकांना घरे, युवकांसाठी १ लाख कोटींचा व्याजमुक्त निधी, लखपती दीदी योजनेतून ३ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा संकल्प, नव्या रेल्वे डब्यांची निर्मिती, रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींची तरतूद, शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना, पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना थेट मदत, पीक विमा योजना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत अशा अनेक विकासाच्या योजना या अंतरिम अर्थसंकल्पातून सत्यात येणार आहेत. विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा हा परिपूर्ण अर्थसंकल्प आहे.
- धनंजय महाडिक, खासदार
........
यावर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प मध्यमवर्गीय, महिला, युवक, शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. रेल्वे, विमान सेवेमुळे दळण-वळणास चालना मिळेल व पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मिती होईल. देशाची अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी मदत होईल.
- प्रा. संजय मंडलिक, खासदार
...............
बेरोजगार तरुणांबाबत निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असे वाटत होते. गॅस दर, पेट्रोल डिझेल दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारचे धोरण हे सर्वसामान्य लोकांना अडचणीत आणणारे आहे. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. अंतरिम अर्थसंकल्पात गरिबी, शेतकरी, महिला, युवक यांना केंद्रस्थानी ठेवल्याचे सांगत ‘विकसित भारत’चे गाजर दाखविले आहे. कृषी धोरणात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे.
- आमदार सतेज पाटील, विधानपरिषद गटनेता
.............
शेतकऱ्यांसाठी ठोस कृती कार्यक्रम अर्थसंकल्पामध्ये नाही. सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्याही तरतुदी नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पातून लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
- व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
..........
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे मोठे बदल अपेक्षित नव्हते. परंतु, देशाच्या एकूण विकासासाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन व विकास या क्षेत्रांसाठी विशेष भर दिला आहे, असे जाणवते. एकूणच या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो.
- ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
.........
सर्व घटकांना सामावून घेणारा आणि देशाची प्रगती साधणारा अर्थसंकल्प आहे. दळण-वळण सेवा मजबूत करण्याबरोबरच महिला, युवक, गरीब व शेतकऱ्यांना केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा दिला आहे.
- बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
.......
९ वर्षांपासून मोदी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही. या अर्थसंकल्पात देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस फार मोठ्या आशा बाळगून होत्या. वारंवार देशपातळीवर आंदोलने करूनही सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची घोर निराशा केली आहे.
- आप्पा पाटील, अध्यक्ष, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन
...............
आगामी वर्षाचे लेखानुदान मंजूर करण्याबरोबरच सवलतींचा पाऊस पडला नसला तरी समाजातील महिला, युवक, गरीब व अन्नदाता शेतकरी या चार मुख्य घटकांना चांगले समाधान मिळेल, अशा काही खास तरतुदी अर्थसंकल्पात आहेत. छोट्या आणि मध्यम, छोट्या सूक्ष्म व मध्यम प्रकल्पांसाठी आत्मनिर्भर योजनेद्वारे सगळ्यांना स्वयंरोजगार मिळणार आहे.
- किरण कर्नाड, बँकिंग तज्ज्ञ
..........
आजपर्यंत सर्वात कमी वेळेत मांडलेला बेरोजगार, अनुसूचित जाती, दलितांसाठी, आदिवासींसाठी, ओबीसींसाठी, अल्पसंख्याकांसाठी, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, कामगार,महिला, विद्यार्थी व मध्यमवर्गीय यांचा अपेक्षाभंग करणारा, त्यांच्यासाठी काहीही न देणारा हा अर्थसंकल्प आहे.
- सतीशचंद्र कांबळे, जिल्हाध्यक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
................
हा अर्थसंकल्प प्रत्येक घटकाच्या प्रगतीला चालना देणारा आहे. राज्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार असून, ही रक्कम ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. प्राप्तिकरामध्ये वाढ केलेली नाही. परकीय चलनात वाढ होण्यासाठी पथदर्शी उपाययोजना राबवल्या आहेत. ई-वाहनांना चालना देण्यासाठी तरतूद केली आहे. १ कोटी घरांवर सौरऊर्जा निर्मिती करणारी पॅनेल बसवण्यासाठी तरतूद आहे. वंदे भारत योजनेतून रेल्वे सक्षमीकरणालाही गती मिळणार आहे.
-विजय जाधव, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
.........
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा नोकरदार, व्यापार- उद्योग क्षेत्राला होती. परंतु त्यामध्ये बदल केलेला नाही. या बाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा फेरविचार करावा. पायाभूत सुविधांवर दिलेला भर फायदेशीर ठरेल. त्यामुळे भविष्यात देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.
- जयेश ओसवाल, सचिव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
.....................
या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा होत्या. पण, शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. महागाई कमी करण्यासाठी पावले उचललेली नाहीत. महागाईच्या वणव्यात जनता होरपळली असतानाही गॅस, पेट्रोल डिझेल यासह दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंचे दर कमी केलेले नाहीत.
- संदीप देसाई, प्रदेश संघटक सचिव, आम आदमी पार्टी
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com