फिरस्ता बातमीदार लेख

फिरस्ता बातमीदार लेख

फोटो 79776, 79782

फिरस्ता बातमीदार
-ओंकार धर्माधिकारी
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ

प्रचार नाही गावात, मतदान आहे मनात
काहीजण नेता सांगेल तसं, तर काहीजणांकडून परिवर्तन करण्याचा सूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार दिसत नाही. उमेदवारही फार ठिकाणी गेलेले नाहीत; मात्र लोकांनी मतदान कोणाला करायचे हे पक्के ठरवले आहे. काहीजण नेता सांगेल तेथे, तर काहीजण परिवर्तनासाठी मतदान करणार हे बोलून दाखवतात. शेतकरी राजू शेट्टींना सहानुभूती दाखवतात, तर मोदी म्हणून तरुण धैर्यशील माने यांना पाठिंबा दर्शवतात; मात्र नेमकं काय होणार हे मात्र मतदानानंतरच कळणार आहे.
----

‘हिथं अजून कोण आलं न्हाय. अहो, उमेदवार सोडाच, कर्णा लावलेली रिक्षासुदीक फिरकली न्हाय. हितून पुढं परचार सुरू व्हईल. नेत्यानं सांगावा धाडला की, मग पोरं फिराय लागत्यात. तसं आमचं गाव फारसं राजकारणात न्हाई. जयंत पाटील साहेबानं हिथं काम केलंय. त्ये सांगतील तिथं मतदान करणारी माणसं हाईत. पोरांचं काय सांगता येत न्हाई.’ वाळवा तालुक्यातील शिगावमधील आबांची ही प्रतिक्रिया. इथल्या मुख्य चौकातील पतसंस्थेच्या पायरीवर पाच-सहा ज्येष्ठ नागरिकांचा एक गट बसलेला होता. त्यातील या आबांनी आपले मत नोंदवले. शिगाव तसे नेटनेटके गाव. गावातील चौकात पेवर ब्लॉकच बसवलेत म्हणजे रस्ता उखडला, खड्डा पडला काही भानगडच नाही. हनुमान मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळेची आखीव-रेखीव इमारत. गावातील स्वच्छता नजरेत भरणारी. अजून गावात पोस्टर नाही, भिंती रंगवलेल्या नाहीत. राजकारणाची फारशी चर्चा नाही; पण गावातील एक-दोन मंडळींशी बोलल्यावर गावाने मतदान कोणाला करायचे हे ठरवलेले आहे असा अंदाज येतो. शिगावमधून आमचा पडवळवाडीचा प्रवास सुरू झाला. दुतर्फा शेतीमधून जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना इथल्या प्रयोगशील शेतीची कल्पना येते. उसाच्या बाजूला घेतलेला हायब्रीड जोंधळा. ठिबक आणि तुषार सिंचनाचे प्रयोग पाहायला मिळतात. उसाची उंची, जाडी पाहिली की, इथल्या कसदार जमिनीची कल्पना येते. एकूणच इथला बहुतांशी शेतकरी हा सधन आहे. त्याच्या बोलण्यात विकासाची, प्रगतीची भाषा ऐकायला मिळते. पडवळवाडीत शेतकऱ्यांचा एक जथ्था रोजच्या कामाच्या जोडण्या लावत होता. त्यांना निवडणुकीचे विचारल्यावर एक शेतकरी म्हणाले, ‘निवडणुका येत्यात अन् जात्यात; पण आमच्या जगण्यात काय बदल झालाय काय? कोण खासदार आमच्या गावात कवा आलाय? आला तरी त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना भेटतोय आणि जातोय. गावात खासदाराने काय केलंय?’ मतदान कोणाला करणार असं थेट विचारल्यावर एक शेतकरी म्हणाले, ‘राजू शेट्टींनी उसासाठी आंदोलन केलं. मग आम्ही त्यांना मतदान केलं. ते परत राष्ट्रवादीच्या कारखानदारांसोबत गेले. मग आम्ही मानेंना मतदान केले. आता बघायचे कोणाला मतदान करायचे ते.’ पुढे आष्टा गाव आले. जागोजागी शिक्षण संस्था दिसतात. परजिल्ह्यातूनही इथे मुले अभियांत्रिकी शिक्षणासाठी आलेली दिसली. इथे एका खोपीत वर्तमानपत्र वाचण्याची सुविधा आहे. तिथे ज्येष्ठ नागरिक वर्तमानपत्र वाचत होते. त्यांतील काहींना विचारल्यावर ते म्हणाले, ‘निवडणुकीत काय होतंय, उमेदवार स्थानिक नसतोय. त्यामुळं स्थानिक माणसं कोण प्रचारात फारशी नसत्यात. कार्यकर्ते असत्यात; ते पण जेवणावळीपुरतं. कामाधंद्यातनं कुणाला वेळ मिळतोय होय प्रचाराला’. वस्तुस्थिती ऐकून तिथनं मोर्चा निघाला वाळवा गावात. सुरुवातीलाच हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लागला. हुतात्मा उद्योग समूहाने या परिसराचा कायापालट केल्याचे लोकांच्या बोलण्यातून आले. सहकारातून आलेली समृद्धी इथे पाहायला मिळते. बाजारात खरेदीसाठी आलेले एक गृहस्थ भेटले. गावात प्रचाराचे काय सुरू आहे? विचारल्यावर ते म्हणाले, ‘अजून तरी गावात प्रचार सुरू नाही. कधीतरी एखादी प्रचाराची रिक्षा येते. अजून गावातील कार्यकर्त्यांनी फिरायला सुरूवात केली नाही. गावात तसे दोन गट आहेत. दोघांची भूमिका एकमेकांच्या विरोधात असते. वैभव नायकवडी सांगतील तिथे मतदान करणारा मोठा वर्ग आहे. आमदार जयंत पाटील यांना मानणाराही वर्ग आहे. त्यामुळे कोणाला जास्त मतदान मिळणार हे आत्ता सांगता येत नाही. सध्या तरी महायुतीच्या बाजूने वातावरण दिसत आहे.’ याच गावात एक राजू शेट्टी यांचा कार्यकर्ता भेटला. त्याने तर निवडणुकीचा निकालच लावला. ‘आमच्या उसाला दर कुणी मिळवून दिला. तवा हे आलती काय? काठ्या कुनी खाल्ल्या. तवा कोण आलतं काय? मागल्या टायमाला चूक केली हे आता लक्षात आलंय. त्यामुळे यंदा पुन्हा शेट्टीच’. वाळवा गावात जैन समाजाची मोठी वस्ती दिसली. तिथे साऱ्यांचा सूर शेट्टींकडे असल्याचे दिसले. वाळव्यातून इस्लामपुरातील बाजारातच थेट गेलो. कासेगाववरून माळवं विकायला वृद्ध जोडपे आले होते. त्यांनी थेटच भूमिका घेतली, ‘हे बघा आम्ही आलो कासेगाववरून. हिथलं आम्हाला काय माहिती नाही; पण कासेगावात तर शेट्टींचं वारं दिसतेय’. इस्लामपूरमधील रिक्षावाले, फळ विक्रेते यांनी थेट प्रतिक्रिया द्यायचे टाळले; पण ‘आमचं कसं जयंत पाटील साहेब सांगतील तसं’ असा त्यांचा सूर दिसला. इथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यासाठी मैदानावार स्टेज उभे करायचे काम सुरू होते.

चौकट
पदवी घेतली की, पुणे गाठायचे...
इस्लामपूरच्या उपनगरात लोकांनी थेट बोलायचे धाडस केले. कोणी शेट्टी, कोणी माने, तर कोणी उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी सत्यजित पाटील यांची नावे घेतली; पण खासदार स्थानिक नाही. निवडणुकीत एकदा दर्शन दिलं की, पुढच्या निवडणुकीलाच दर्शन. त्यामुळे इथले प्रश्न सोडवण्याकडे त्यांचे फारसे लक्ष नसते, अशी खंत काही तरुणांनी व्यक्त केली. औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद पडलेत. नवे उद्योग नाहीत, रोजगार नाही. पदवी घेतली की, पुणे गाठायचे असेच सुरू आहे. स्थानिक खासदार असता तर जरा बरे झाले असते. येलूर, कोरेगाव या गावांत अजून प्रचार नाही.

चौकट
योगी पाहिजे
इस्लामपुरातील एक तरुण म्हणाला, ‘आमच्या इथे गुन्हेगारी वाढली आहे. सातवीतली पोरं ‘बाप तो बाप रहेगा’ म्हणून स्टेटस ठेवतात. आता इथे योगीच पाहिजे, तरच गुन्हेगारी संपेल. त्यांची एक सभा इस्लामपुरात व्हायला पाहिजे.’ त्याची प्रतिक्रिया बरेच काही सांगणारी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com