बालगायक अयान मांगलेने जिंकली मेलबर्नवासियांची मने, ठरला 'VSSS' चा उगवता तारा

बालगायक अयान मांगलेने जिंकली मेलबर्नवासियांची मने, ठरला 'VSSS' चा उगवता तारा

सध्या मेलबर्नमध्ये राहत असला तरी, अयानचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे झाला आहे.
Published on

व्हिक्टोरियन स्टेट स्कूल स्पेक्टॅक्युलर (VSSS) हा मेलबर्नमध्ये गेली ३० वर्षे सप्टेंबर महिन्यात आयोजित केला जाणारा एक भव्य संगीत कार्यक्रम आहे. यंदाचा कार्यक्रम १३ सप्टेंबर २०२५ रोजी जॉन केन अरेना येथे दुपारी १ आणि संध्याकाळी ६.३० वाजता पार पडला.

व्हिक्टोरिया राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा व्हिक्टोरियामधील ८२ सरकारी शाळांमधून २,००० मुलांनी यात भाग घेतला. या कार्यक्रमाची तयारी फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. सिंगिंग, डान्सिंग, स्टेज मॅनेजमेंट, साऊंड सिस्टीम आणि लाईट इफेक्ट्सचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करतात. सिंगिंग आणि डान्सिंगसोबतच जिम्नॅस्टिकसारखे 'स्पेशालिटी अॅक्ट्स' देखील सादर केले जातात. हा शो एखाद्या प्रोफेशनल रॉक शोपेक्षाही जास्त दिव्यांनी उजळलेला असतो.

कार्यक्रमासाठी १०० 'मेनकास्ट' गायकांची निवड केली जाते. ऑडिशन्समधून निवड झालेल्या या गायकांना व्हिक्टोरिया राज्यातील उत्कृष्ट गायक आणि संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाते. दर शनिवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत त्यांच्या गाण्याचा सराव घेतला जातो.

बालगायक अयान मांगलेने जिंकली मेलबर्नवासियांची मने, ठरला 'VSSS' चा उगवता तारा
शिवरायांच्या जीवनावर आधारित मेलबोर्नमध्ये सादर झालेले महानाट्य “महाराज द किंग”

अयान मांगलेची निवड

यावर्षी निवड झालेल्या १०० मेनकास्ट गायकांपैकी महत्त्वाच्या ३० गायकांमध्ये चि. अयान मांगले याची निवड झाली आहे. अयानची गेल्या चार वर्षांपासून राज्यस्तरीय बालकलाकार आणि गायक म्हणून 'मेनकास्ट'मध्ये निवड होत आहे. मूळचा महाराष्ट्रातील जयसिंगपूरचा असलेल्या अयानची आई भक्ती मनीष मांगले (मूळ नाव भक्ती अजित निटवे) आहे.

१२ वर्षांचा अयान केवळ उत्तम गायकच नाही तर एक चांगला अभिनेताही आहे. त्याला वेस्टर्न म्युझिकची आवड असून तो इंग्रजी गाणी गातो. अलीकडेच, मेलबर्नमध्ये सादर झालेल्या 'शिवाजी द किंग' या महानाट्यात त्याने बालशिवाजीची भूमिका साकारली. त्याच्या आत्मविश्वासाने, संवादफेकीने आणि चेहऱ्यावरील तेजाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. नृत्य, नाट्य, अभिनय आणि गायन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अयानची यशस्वी वाटचाल सुरू आहे आणि भविष्यात तो एक उत्तम गायक बनण्याचे स्वप्न पाहत आहे.

सध्या मेलबर्नमध्ये राहत असला तरी, अयानचा जन्म भारतात झाला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, शिवरायांचे किल्ले आणि इतिहास याबद्दल त्याला विशेष रुची आहे.

जॉन केन अरेनामध्ये ११,००० प्रेक्षकांची क्षमता असूनही, १३ सप्टेंबर रोजी पार पडलेले दोन्ही शो हाऊसफुल्ल होते. एकूण २२,००० मेलबर्नवासीयांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व्हिक्टोरिया राज्य सरकारचा हा उपक्रम म्हणजे भविष्यातील सुजाण पिढी घडवण्यासाठी केलेली उत्तम गुंतवणूक आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहून सर्व प्रेक्षक भारावून गेले आणि या उगवत्या ताऱ्याचे, अयानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com