

41705
प्रशासन डिजिटल दिशेने वेगात
७५ संगणकांसह साहित्य वाटप; पालकमंत्र्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जिल्ह्यात ''ई-ऑफिस'' प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून संगणक व अत्याधुनिक डिजिटल वस्तू देण्यात आल्या. योजनेतून १ कोटी रुपये खर्चून हे साहित्य खरेदी करण्यात आले असून, त्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे साहित्य वितरीत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ७५ संगणक संच, ५० प्रिंटर्स, २ कलर प्रिंटर्स, ११ स्कॅनर्स, १ झेरॉक्स मशीन आणि ७८ यूपीएस यांसारख्या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. या साहित्यामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येणार असून फाईल्सचा प्रवास अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासकीय कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे आवाहन केले. लोकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी यासाठी प्रशासनाला भौतिक सुविधा व डिजिटल साहित्य मोठ्या प्रमाणावर दिले आहे. या उपकरणांच्या सहाय्याने ई-ऑफिस प्रणालीचा वापर करून प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोक माने यांनीही उपस्थित राहून महसूल प्रशासनाच्या डिजिटल क्रांतीचे कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.