

60295
लोगो ः क्रीडा दिन विशेष
.............................
60249
शशिकांत जाधव
.................
मोडक्या स्टिकच्या मोळीतून श्रीगणेशा
‘हॉकी व्हिलेज’ नूलची सुवर्णमय वाटचाल ः सायकलच्या इनर, टॉवेलच्या पट्यांनी दिला आधार
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : दगडधोंडे, खाचखळगे आणि सुविधांचा अभाव. मात्र जिद्द, मेहनत आणि नसानसांत भिनलेली खेळाची रग! याच जोरावर नूल (ता. गडहिंग्लज) या छोट्याशा गावाने हॉकीच्या मैदानावर गेल्या अर्धशतकात वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, या ‘हॉकी व्हिलेज’चा श्रीगणेशा झाला तो एका महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या लिलावातून मिळालेल्या मोडक्या हॉकी स्टिकच्या मोळीने! सायकलच्या खराब इनर आणि जीर्ण टॉवेलच्या पट्ट्यांनी बांधलेल्या या स्टिकनी पुढे नूलच्या शेकडो खेळाडूंच्या स्वप्नांना आकार दिला.
तत्कालीन क्रीडाशिक्षक शशिकांत जाधव यांनी १९७६ मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हॉकीचे रोपटे लावले. त्यानंतर खेळाडू बदलले, प्रशिक्षकांच्या पिढ्या बदलल्या; पण नूलच्या हॉकीची धग मात्र कायम राहिली. जिल्हा, विभाग आणि राज्याच्या सीमा ओलांडत येथील खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत प्रतिष्ठेच्या नेहरू करंडक स्पर्धेसाठी दिल्ली गाठण्याची हॅटट्रिक साधली. आजवर तब्बल सहाशेहून अधिक राष्ट्रीय खेळाडू या मातीतून घडले आहेत. याच परंपरेला आता सानिका मानेच्या रूपाने आंतरराष्ट्रीय झळाळी मिळाली आहे. नूलमध्ये शालेय हॉकी गाजविल्यानंतर सानिका सध्या मुंबईच्या साई केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. सलग दुसऱ्या युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने भारतीय हॉकी वर्तुळाचे लक्ष पुन्हा एकदा नूलकडे वेधले आहे.
‘स्वातंत्र्यसैनिकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूलने हॉकीच्या माध्यमातूनही आपली नवी ओळख निर्माण केली आहे. यंदा या ‘हॉकी व्हिलेज’चा सुवर्णमहोत्सव दिमाखात साजरा होत असताना, मोडक्या स्टिकपासून सुरू झालेला हा प्रवास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षितिजाला गवसणी घालत आहे.
क्रीडाशिक्षक जाधव नूलच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पहिल्या तुकडीचे (१९५६) विद्यार्थी. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अनुशासन योजनेंतर्गत राजस्थानमध्ये प्रशिक्षण घेतले. यानंतर चंदगड आणि आसाममध्ये दोन जिल्ह्यांत या योजनेचे समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर नूलच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १७ वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून हॉकीचा पाया भक्कम रचला. त्यानंतर प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून सुमारे अडीच वर्षे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले. सेवानिवृत्तीनंतरही हॉकीशी जोडलेली नाळ त्यांनी कायम राखली आहे. नूलमधील कोणतीही हॉकी स्पर्धा असो, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते नवोदित हॉकीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूरहून येऊन नेहमी मदत करतात.
......................
चौकट...
ऑलिंपिकपटूंचे मार्गदर्शन
नूल खरे तर कुस्ती, मल्लखांबपटूंचे गाव. साहजिक स्थानिकांमध्ये जन्मापासूनच खेळाबद्दल आवड आहे. सत्तरच्या दशकात प्रशिक्षणाच्या निमित्ताने राजस्थानमध्ये तत्कालीन क्रीडाशिक्षक शशिकांत जाधव यांनी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते गुरुमितसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर हॉकीचे धडे गिरविले. यातूनच जाधव यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लिलावातून घेतलेल्या स्टिकमधून १९७६ ला हॉकीची मुहूर्तमेढ रोवली. ऑलिंपिकपटूंच्या अनुभवाच्या शिदोरीतून मिळालेले बाळकडू जाधव यांना हॉकी प्रशिक्षणासाठी मोलाचे ठरले. वर्षभरातच खेळाडूंनी झोकून देऊन केलेल्या सरावाला शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अजिंक्यपदाचे पहिले टॉनिक मिळाले. तेव्हापासून सुरू झालेली नूलच्या हॉकीची घोडदौड आजअखेर कायम आहे.
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.