फुटबॉल

फुटबॉल

खंडोबा तालीम अंतिम फेरीत
---
‘फुलेवाडी’वर टायब्रेकरवर तीन विरुद्ध दोन गोलफरकाने विजय; निखिल खन्नाचे दोन गोल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : महापालिका चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाला टायब्रेकरवर तीन विरुद्ध दोन गोलफरकाने नमवून आज अंतिम सामन्यात प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना १-१ ने बरोबरीत राहिल्यावर खंडोबाच्या खेळाडूंनी टायब्रेकरमध्ये कमाल केली. त्यांचा गोलरक्षक निखिल खन्नाने दोन गोल तटवून संघाला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. महापालिकेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर चढाया केल्या. ‘खंडोबा’च्या अजीज मोमीनच्या पासवर अबूबकरने ३४ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर ‘खंडोबा’कडून चढायांचा जोर आणखी वाढला. त्यांच्या संकेत मेढे याने फ्री किकवर फटकावलेला चेंडू ‘फुलेवाडी’च्या वरच्या गोलखांबाला लागून मैदानात परतला. गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून स्टेनली, मंगेश दिवसे, प्रतीक सावंत, आदित्य रोटे यांनी प्रयत्न केले. ‘खंडोबा’च्या बचावफळीने त्यांना वेळीच रोखले. उत्तरार्धात ‘फुलेवाडी’कडून स्टेनलीने ४६ व्या मिनिटाला गोल करीत संघाला बरोबरी साधून दिली. त्याने केलेला गोल ‘खंडोबा’चा गोलरक्षक निखिलला चकवा देणारा ठरला. त्याने मोठ्या डीतून गोलजाळीच्या डाव्या कोपऱ्याची दिशा दाखवली. ‘खंडोबा’कडून संकेत, दिग्विजय आसनेकर, अजीज मोमीन, तर ‘फुलेवाडी’कडून रोहित मंडलिक, संदीप पोवार यांनी आक्रमक चढाया केल्या. त्यांचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. पूर्णवेळेत सामना १-१ ने बरोबरीत राहिल्याने तो टायब्रेकरवर खेळविण्यात आला. त्यात ‘खंडोबा’चे पारडे भारी पडले.
.................
चौकट
टायब्रेकर असा
फुलेवाडी* खंडोबा
अक्षय मंडलिक - चेंडू गोलजाळीवरून * प्रथमेश गावडे- गोल
स्टेनली केल्विन - गोल * श्रीधर परब- चेंडू तटवला
सिद्धेश यादव - चेंडू तटवला * प्रभू पोवार- गोलजाळी बाहेर
अरबाज पेंढारी - चेंडू तटवला * संकेत मेढे- गोल
रोहित मंडलिक - गोल * ऋतुराज संकपाळ- गोल

चौकट
उत्कृष्ट खेळाडू
- निखिल खन्ना (गोलरक्षक, खंडोबा तालीम मंडळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com