नानीबाई चिखली - महालक्ष्मी यात्रा

नानीबाई चिखली - महालक्ष्मी यात्रा

सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान
श्री महालक्ष्मी देवी
----------------

नानीबाई चिखली (ता. कागल) येथील श्री महालक्ष्मीचे देवस्थान सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. येथे संस्थान काळापासून दर तीन वर्षांनी मोठ्या प्रमाणात श्री महालक्ष्मीची यात्रा भरवली जाते. या यात्रेचा उद्या बुधवार ( ता.१० ) मुख्य दिवस आहे त्यानिमित्ताने...
- रमजान कराडे, नानीबाई चिखली
-------------------

निपाणी - राधानगरी राज्यमार्गावरील खडकेवाडा गावापासून उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर वसलेले ८ हजार लोकवस्तीचे संस्थान काळातील नानीबाई चिखली हे गाव. नानीबाई नावाची पराक्रमी राणी होऊन गेली. तिच्या नावावरूनच गावाला नानीबाई चिखली हे नाव पडले. राणी मोठी श्रद्धाळू होती. त्यामुळे ती अनेक मंदिरांना मुक्तहस्ते मदत करीत असे. त्यामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर, गहिनीनाथ, हनुमान, मरगूबाई मंदिर यांचा समावेश होता. या देवतांच्या यात्राही दरवर्षी सर्वधर्मीयांचे लोक एकत्र येऊन साजरे करतात.
श्री महालक्ष्मी यात्रा दर तीन वर्षांनी होते. मध्यंतरी तीस वर्षे ही यात्रा भरवली जात नव्हती. यशवंतराव भोसले, भीमराव भोसले व बाबूराव शिरगुप्पे यांनी भाग घेऊन ही यात्रा पुन्हा सुरू केली. तत्कालीन यात्रा समिती बापूसाहेब भोसले व रावसाहेब भोसले यांच्या सहकार्याने यात्रा उत्साहात होऊ लागली. यात्रेची सुरुवात इरडी पौर्णिमेपासून इरडे घालून होते. या दिवशी दलित समाजाची स्थानिक लक्ष्मी गावातून वाजतगाजत नेऊन तिच्या मूळ जागी (मंदिरात) बसवतात. त्या ठिकाणी यात्रा कमिटीकडून ओटी भरून इरडे घातले जातात. यावेळी कमिटीमार्फत यात्रा उत्साहात पार पडावी, यासाठी पोलिसपाटील, सरपंच, गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, यात्रा कमिटीचे पंच, गावातील मान्यवर तसेच बारा बलुतेदारांना बोलावून विडा दिला जातो.

इरडी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी कुंभार समाज व गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पहाटे पाच वाजता कुंभार गल्लीत देवीची प्रतिष्ठापना केली जाते. यावेळी कुंभार समाजाकडून सर्वप्रथम ओटी भरणेचा कार्यक्रम होतो. हा दिवस यात्रेचा पहिला दिवस समजला जातो. यावेळी यात्रा कमिटीकडून सर्वप्रथम लक्ष्मीची बहीण मरगूबाई हिची ओटी भरली जाते. त्यानंतर ठाणाची लक्ष्मी, नदीची ओटी, नाणीबाईची ओटी, नावेची ओटी भरली जाते. खोकड सत्ती, भैरवनाथ, सटवाई, जाळीचा म्हसोबा, हरिजन वसाहतीतील थळोबा, कानोबा, नागोबा, गैबीपीर, हलसिद्धनाथ यांना नैवेद्य निशाण देण्यात येते.

त्यानंतर मानाची यात्रा कमिटीची साडी, ओटी सर्वप्रथम कुंभार गल्ली येथे ९ वाजता भरली जाते. ओटी भरल्यानंतर देवीची मूर्ती वाजतगाजत सकाळी गावच्या मध्यभागातून निघून कुंभार वाड्यात सकाळी १०.३० वाचायच्या आत बसवली जाते. त्यानंतर गावातील सर्व माहेरवाशिणींकडून महालक्ष्मीची ओटी रात्री दहा वाजेपर्यंत भरली जाते. त्यानंतर मानाचे गाव कामगार पोलिसपाटील यांच्याकडून साडी, ओटी भरली जाते. ती साडी, ओटी भरल्यानंतर रात्री दहा वाजता देवीची मूर्ती खेळण्यासाठी उठवली जाते. गावच्या मध्यभागातून रात्रभर देवीची मूर्ती मिरवणुकीने खेळत खेळत वेशीच्या उत्तरेला असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराशेजारी १० फुटांच्या अंतरावर दक्षिण दिशेला असलेल्या मंडपातील विशिष्ट जागेवर नेऊन तिथे बसवली जाते. यावेळी गावच्या मुख्य चौकात आतषबाजी होते. यावेळी मिरवणुकीत ओटी भरण्याचा मान दोन्ही भोसले घराण्यांना असतो.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून कार्यक्रम होतात. देवीचा जागर,नवस बोलणे,नवस फेडणे, माहेरवाशिणींकडून ओटी भरणे, देवीची आराधना, उपासना भक्तिभावाने होते. तसेच आलेल्या पै-पाहुण्यांना जेवणाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो.
यात्रेच्या शेवटच्या दिवशी महालक्ष्मीची मूर्ती दुपारी पाच वाजता गावातून मिरवणुकीने वाजतगाजत जात गावच्या दक्षिणेला असणाऱ्या मंदिराजवळ जवळपास १० तासानंतर विसर्जित होते. सर्वधर्मीयांकडून लोकवर्गणी गोळा करून यात्रा उत्साहात साजरी केली जाते. यात्रा कमिटी व चिखली ग्रामपंचायत योग्य नियोजन असते.
----------
चौकट
वर्षभर सोहळे गावच्या हद्दीबाहेर
महालक्ष्मी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या विसर्जन मिरवणुकीनंतर पुढील वर्षाच्या इरडी पौर्णिमेपर्यंतच्या मधल्या काळात गावात लग्नसोहळा वाजत, गाजत पार पाडला जात नाही.

फोटो - श्री महालक्ष्मी देवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com