वडगावमध्ये दीड तास टीव्ही, मोबाईल बंद

वडगावमध्ये दीड तास टीव्ही, मोबाईल बंद

वडगावमध्ये दीड तास टीव्ही, मोबाईल बंद
विद्याताई पोळ; शिवजयंतीपासून होणार उपक्रमाची सुरवात
पेठवडगाव, ता. १३ : मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरामुळे भावी पिढीवर होणारे दुष्परिणाम, ते होऊ नयेत म्हणून सुदृढ पिढी घडवण्यासाठी एक पाऊल म्हणून रोज दीड तास मोबाईल, टीव्ही बंदचा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची सुरवात शिवजयंतीपासून होणार आहे. उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
त्या म्हणाल्या, ‘शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे काम पाहताना पालक बैठकीत अनेक पालकांच्या मोबाईल व टीव्ही यांच्याबद्दल तक्रारी येत होत्या. विद्यार्थी मोबाईलबाबत व्यसनी झाल्यामुळे घरात अभ्यास करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवण्याचा निर्धार केला जात आहे. कुटुंबातील एकमेकांत संवाद हरपला आहे. नात्यामध्ये अंतर वाढले आहे. वाचन संस्कृती लोप पावत आहे. असे अनेक दुष्परिणाम समाजव्यवस्थेवर होत आहेत. यासाठी सर्वसंमतीने, कोणतेही राजकारण न आणता सर्व गट, तट मिळून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आम्ही वडगावकर या नावाखाली हा उपक्रम राबवला जाईल. याची सुरवात शिवजयंतीपासून होईल. या दरम्यान या उपक्रमाचा प्रचार, प्रसार केला जाणार आहे.’
रोज सायंकाळी सात ते रात्री साडेआठ या दरम्यान घरातील टीव्ही, मोबाईल बंद राहतील. दरम्यान, गावात सात वाजता भोंगा वाजवला जाईल. त्यानंतर दीड तास मोबाईल, टीव्ही बंद ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला जाणार आहे. शिवजयंतीदिवशी उपक्रमाची सुरवात होणार आहे. या दिवशी एक हजारांपेक्षा अधिक नागरिक संकल्प पत्र देणार आहेत. यावेळी सर्व नागरिक एकत्रित येऊन शपथ घेतील व उपक्रमाची सुरवात होणार आहे, असे सांगितले. पत्रकार परिषदेस माजी उपनगराध्यक्ष सुनील हुकेरी, माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव, माजी मुख्याध्यापिका शोभा देसावळे, अभिजित गायकवाड, माजी नगरसेवक संदीप पाटील, सचिन चव्हाण, जवाहर सलगर, शिवाजीराव आवळे, संभाजीराव माळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com