शिरोळ मध्ये कडकडीत बंद

शिरोळ मध्ये कडकडीत बंद

शिरोळमध्ये कडकडीत बंद

शिरोळ, ता. १८ : व्हाट्सअप स्टेटसवर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे शिरोळ येथील एका युवकाच्या विरोधात फिर्याद देण्यात आली होती. फिर्याद देणाऱ्या युवकावर शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी संशयित व अन्य दोघांच्या विरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच अन्य दोन संशयित हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीकरीता शिरोळ शहर शनिवारी बंद ठेवण्यात आले. दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी, शिरोळ परिसरातील एका कॉलेजमध्ये शिकत असलेल्या संशयिताने आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसला महापुरुषांबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवून त्यांचा अपमान केला होता. याबाबत स्वानंद महादेव पाटील (रा. संभाजीपूर) यांनी बुधवारी शिरोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याचा राग मनात ठेवून शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास केपीटी चौकाच्या पुढे उदगाव रस्त्याजवळ संशयिताच्या सांगण्यावरून, संशयित व त्याच्या अन्य दोन अनोळखी साथीदारांनी स्वानंद पाटील यांची मोटारसायकल अडवून शिवीगाळ केली. तसेच एका साथीदाराने ठार मारण्याचे हेतूने चाकूने हाताच्या दंडावर व पोटावर वार केला. अशी फिर्याद स्वानंद पाटील यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री दिली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे तसेच उपाधीक्षक रामेश्वर वैंजणे यांनी मध्यरात्री शिरोळ पोलिस ठाण्यास भेट दिली. संतप्त युवकांनी या घटनेचा रात्री निषेध केला. तसेच या घटनेतील सर्व संशयिताना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. जोपर्यंत संशयिनांना अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांनी संशयितांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर संबधित युवक रात्री घरी परतले.
या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य ओळखून शिरोळ पोलिसांनी पोलिसांची जादा कुमक मागवून शहरातून संचलन केले.
दरम्यान, शनिवारी दुपारी येथील मुस्लिम समाजाने शिरोळ पोलिस ठाण्याला निवेदन दिले. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com