शिरोली : मंदिराचा इतिहास

शिरोली : मंदिराचा इतिहास

शिरोलीतील आध्यात्मिक वैभव

गणेश मंदिर
सुमारे १०० वर्षांपूर्वी पुणे-बंगळूर महामार्गालगत पूर्वेला शिरोलीत वेशीवर गणेश मंदिर होते. अनेक भक्त दर्शन घेऊन ये-जा करत. महामार्गाचे चौपदरीकरण होणार म्हटल्यावर शिरोलीतील शामराव चौगुले यांनी हे मंदिर आपल्या जागेत हलविले. त्या ठिकाणी जीर्णोद्धार करून काही भक्तांच्या मदतीने नवीन मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

श्री म्हसोबा मंदिर
गावात म्हसोबा देवाची दोन मंदिरे आहेत. एक मंदिर मोरे गल्ली व कुटवाडे गल्ली या गल्ल्यांच्या शेवटच्या टोकाला थोड्या अंतरावर आहे. श्री बिरदेवबरोबर म्हसोबा देवाचाही जळाला कार्यक्रम दर तीन वर्षांनी होतो. दुसरे म्हसोबा मंदिर राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडच्या बाजूस आहे. श्री म्हसोबा हे मूळचे टाकवडे गावचे असून, श्री बिरदेवांबरोबर शिरोलीत येऊन गावाबाहेर स्थानबद्ध झाले.

सर्वेश्वर महादेव मंदिर
‘करवीर काशी’ ग्रंथात उल्लेख असलेले मंदिर गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायतीसमोर आहे. या मंदिराचा इतिहास असा की, गावातील एका पोतनिसांच्या नदीकडच्या रानात तलाव होता. त्या तलावाच्या काठावर पुरातन काळापासून सर्वेश्वर लिंग होते. कालांतराने तलाव नष्ट झाल्याने ते सर्वेश्वर लिंग गावात आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. रोज पूजा-अर्चा केली जाते. दर सोमवारी व शिवरात्रीला सामुदायिक अभिषेकाचा कार्यक्रम होतो.

विठ्ठल मंदिर
हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. गावात राहणाऱ्या ब्राह्मण विधवेने ‘बाप आणि आई, माझी विठ्ठल-रखुमाई...’ या भावनेने पंढरपूरहून मूर्ती आणून त्याची परसदारी पूर्वाभिमुख मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही दिवसांनी तिथे हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर बांधण्यात आले. देवस्थान बांधकाम समितीच्या नियोजनाखाली भव्य मंदिर बांधले आहे. मंदिरात दररोज भजन, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम आषाढी, कार्तिकी एकादशीचे कार्यक्रम होतात. मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो. यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.

मारुती मंदिर
हे शिरोली गावातील पुरातन मंदिर आहे. हे मंदिर गावचावडीला लागून आहे. या मंदिरातील मूर्ती दगडी पाषाणातील होती. अलीकडेच या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोध्दार केला आहे. ग्रामपंचायतीजवळ अतिशय सुबक, आकर्षक आणि मनमोहक मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. मंदिरातील मारुतीची मूर्ती नेत्रदीपक आहे. दर शनिवारी मारुतीला अभिषेक घातला जातो.

श्री साईबाबा मंदिर
येथील मराठी शाळेजवळ युवाशक्ती फ्रेंड्स सर्कलतर्फे साईबाबा मंदिराची उभारणी केलेली आहे. मंदिराची उभारणी सुसज्ज असून साईबाबांची मूर्ती सुबक आहे. मंदिरात नित्य धार्मिक विधी होत असतात.

श्रीराम मंदिर
गावात दोन श्रीरामाची मंदिरे आहेत. मूळ गावात पुरातन श्रीरामाचे मंदिर आहे. तर छत्रपती शिवाजीनगर यादववाडी भागात तानाजी बच्चाराम पाटील यांनी स्वखर्चातून श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात दैनंदिन धार्मिक विधी होत असतात. रामनवमीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या मंदिरांबरोबरच श्री बाळूमामा मंदिर, रेणुका मंदिर, दत्त मंदिर, गोरखनाथ मंदिर, श्री राम मंदिर, जैन मंदिर, घोडेगिरी मंदिर, विश्वकर्मा मंदिर, अशा अनेक मंदिरांबरोबरच मशीद, मदरसे यांनी शिरोली गाव ऐक्यसंपन्न आहे. गावात सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र गुण्या-गोविंदाने नांदत असून, प्रत्येक समाजातील व्यक्ती एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होत असल्याने गावात सामाजिक, धार्मिक ऐक्य टिकले आहे.
- विठ्ठल कृष्णा पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com