
पुढे काहीतरी गडबड झाली. मरगू अण्णांनी हंस चित्रपटगृह बंद केले. येथे तमाशाचे जलसा केंद्र सुरू झाले. येथे ढोलकी कडाडू लागली. फेटे उडू लागले. शिट्ट्या घुमू लागल्या. आणि व्हायच्या तशा तक्रारी झाल्या. काही दिवसांनी हे तमाशा केंद्र बंद झाले. मग तेथे साबणाची फॅक्टरी निघाली पुढे पोहे फुलवण्याची भट्टी सुरू झाली. तीही बंद पडली. त्यानंतर बापू नवरे यांनी तेथे मंगल कार्यालय सुरू केले. आणि चित्रपट गृह ते गणेश मंगल कार्यालय असे टप्पे कोल्हापुरातल्या चित्रपटगृहाच्या वाटचालीने अनुभवले.
आज कोल्हापुरात गांधीनगर सह एकूण सोळा चित्रपटगृहे आहेत. त्यातले १० सुरू आहेत. सहा बंद किंवा नूतनीकरणाच्या टप्प्यात आहेत. चित्रपटगृहाचे स्वरूपही बदलत आहे. ८५ पैसे थर्ड, एक रुपये पाच पैसे सेकंड, अडीच रुपये स्टॉल व साडेतीन रुपये बाल्कनी असा साधारण तिकिटाचा दर होता. आता तो शंभर रुपयांच्या आसपास गेला आहे. मल्टिप्लेक्सचा दर त्याहून वेगळा आहे.
कोल्हापूरला चित्रपटनिर्मितीची परंपरा आहे. अर्थात त्यामुळे कोल्हापुरात चित्रपटगृहाचीही परंपरा तेवढीच जुनी आहे. आत्ताचे शनिवार पेठ पोस्ट ऑफिस, शिवाजी रोडवरील मेरवाडे वाईन शॉपची इमारत, सरस्वती-लक्ष्मी मंगल कार्यालय येथे जुनी चित्रपटगृहे होती. हंस व्हीनस, रॉयल, राजाराम, पद्मा, संध्या, कमल, प्रभात, शाहू ही चित्रपटगृहे चांगली चालत होती. शिवाजी रोडवर आराम कॉर्नरला कमल चित्रपटगृह होते. या चित्रपटगृहाचे पहिले नाव अमेरिकन इंडिया. त्यानंतर या चित्रपटगृहाचे नाव शिवाजी व त्यानंतर कमल झाले. दरक शेट्टी नावाचे गृहस्थ हे चित्रपटगृह चालवत होते. आता तेथे मेरवाडे यांचे दारू दुकान व इतर व्यवसाय आहेत.
१९३१ मध्ये तय्यब अली भोरी यांनी व्हीनस चित्रपटगृह बांधले. हे चित्रपटगृह म्हणजे सुरवातीला पत्र्याचे शेड होते. त्या काळात व्हीनस चित्रपटगृह गावापासून लांब वाटत होते. त्यामुळे भोरी यांनी बिंदू चौकातून व्हीनस चित्रपटगृहापर्यंत प्रेक्षकांना आणण्यासाठी एक गाडीच ठेवली होती. ही सेवा मोफत होती. भोरींनी त्यानंतर बाजूलाच अन्वर चित्रपटगृह बांधले. त्यासाठी भंगारात निघालेल्या जहाजाचे लोखंडी मटेरियल वापरले. या अन्वर चित्रपटगृहाचे नाव पुढे लिबर्टी व त्यानंतर अप्सरा चित्रपटगृह झाले. त्याच दरम्यान शहा परिवाराने उषा चित्रपटगृह बांधले. तेथे शोले चित्रपट तब्बल वर्षभर हाउसफुल्ल चालला.
लक्ष्मीपुरीत रुईकर यांची रॉयल व प्रभात ही चित्रपटगृहे पहिल्यांदा झाली. त्यापाठोपाठ दादासाहेब निंबाळकर यांचे राजाराम चित्रपटगृह झाले. त्याच दरम्यान १९४१ मध्ये पद्मा चित्रपटगृह बांधले गेले. पद्मा चित्रपटगृहाला न्यू टॉकीज म्हणूनही ओळखले जात होते. राजाराम महाराजांच्या कन्या बेबी पद्माराजे यांचे नाव चित्रपटगृहाचे मालक नानासाहेब इंगळे यांनी दिले. राजाराम चित्रपटगृह हे केवळ चित्रपटगृह नव्हते; तर ते राजकीय, सामाजिक घडामोडींचे केंद्र होते. दादासाहेब निंबाळकर तेथे बसून कोल्हापूरचे राजकारण व समाजकारण करीत होते. या चित्रपटगृहाचे मालक आर. डी. निंबाळकर कोल्हापूरचे खासदार होते. या चित्रपटगृहाचे नाव नंतर अयोध्या व आता पुन्हा राजाराम झाले.
रावबहादूर डी. एम. भोसले यांचे शाहू चित्रपटगृह १९४० मध्ये सुरू झाले. शहाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त चित्रपटगृहाच्या उद्घाटनासाठी निवडला गेला. उमा चित्रपटगृहाचे मूळ नाव संध्या. पापा परदेशी यांचे हे चित्रपटगृह बाबा नाडगोंडा यांनी विकत घेतले. तेथे फक्त इंग्रजी चित्रपट लागत होते. त्यांनी संध्या चित्रपटगृहाचे नाव त्यांच्या पत्नी उमादेवी यांच्या नावावरून उमा असे ठेवले. त्यानंतर शहरात सरस्वती, लक्ष्मी, बसंत बहार, पार्वती, संगम ही चित्रपटगृहे सुरू झाली. पार्वती हे पहिले एअरकंडिशनर चित्रपटगृह. लक्ष्मी चित्रपटगृह दुसऱ्या मजल्यावरचे पहिले चित्रपटगृह. सरस्वती, लक्ष्मी चित्रपटगृहांच्या जागी खंबाळा तळे होते. ते तळे मिटवून त्यावर चित्रपटगृह बांधले. त्यामुळे सुरवातीला या चित्रपटगृहात जायला लोक धजावत नव्हते. सरस्वतीचे नाव ऊर्मिला चित्रपटगृह झाले. बुदिहाळकर यांच्या संगम चित्रपटगृहाची बांधणी जहाजाच्या आकाराची होती. आता व्हीनस, उषा, बसंत बहार, उमा, अयोध्या, संगम ही चित्रपटगृहे बंद आहेत. काहींचे नूतनीकरण होणार आहे. याशिवाय आयनॉक्स, पीव्हीआर, पार्वती ही एकावेळी तीन-चार चित्रपट दाखविणारी भव्य चित्रपटगृहे तयार झाली. त्यामुळे कोल्हापूरच्या चित्रपटगृहाची शान अधिकच वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.