
नागाव : पुलाची शिरोलीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी केली. एका ठिकाणी दोन लाख ३० हजार रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असे तीन लाख ८६ हजार रुपयांची चोरी झाली आहे. तर अन्य एका ठिकाणीही मोठी चोरी झाल्याचा अंदाज आहे. मात्र, त्या घरातील कुटुंबीय वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला गेल्याने चोरीस गेलेल्या मालाचा नेमका अंदाज लावता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.