लॉकडाउनमध्येही अखंड संगीतसेवा, घडवले चारशेहून अधिक शिष्य

 Uninterrupted music service even in lockdown, formed more than four hundred disciples
Uninterrupted music service even in lockdown, formed more than four hundred disciples
Updated on

कोल्हापूर  ः ऐतिहासिक भवानी मंडपात रोज संगीताचे सूर उमटतात. ते सूर केवळ उमटतच नाहीत, तर त्या प्रत्येक सुरागणिक एकेक शिष्य तयार होतो आणि पुढे तो देशभरात शास्त्रीय संगीताची परंपरा नेटाने पुढे नेतो. राजर्षी शाहू संगीत विद्यालयाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांत दरबारी गवई अरुण जेरे यांनी चारशेहून अधिक शिष्य तयार केले असून, ते सध्या देशभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. 
दरम्यान, गेल्या साडेपाच महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात भवानी मंडपातील संगीत वर्ग बंद आहेत; मात्र त्यांच्या शिवाजी पेठेतील अर्ध शिवाजी पुतळा परिसरातील घरात सर्व सुरक्षिततेचे नियम पाळत त्यांचे संगीत प्रशिक्षणाचे काम अखंडपणे सुरू आहे. 
श्री. जेरे यांनी राजर्षी शाहू संगीत विद्यालयात 1978 मध्ये नीळकंठबुवा चिखलीकर यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे डॉ. भारती वैशंपायन, पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, पंडित अरुण कुलकर्णी यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले. 1991 ला त्यांची राजर्षी शाहू संगीत विद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाली. त्याच दरम्यान भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात आणि पुढे 2005 मध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दरबारी गवई म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1989 पासून आकाशवाणीवर त्यांचे सुगम संगीत व शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात. 
सध्या लॉकडाउन असला तरी एरवी त्यांचा दिवस सुरू होतो तोच अंबाबाई मंदिरातील गायनसेवेने. सकाळी नऊला अंबाबाई मंदिर, त्यानंतर पावणेदहाला तुळजाभवानी मंदिरात गायनसेवा, त्यानंतर अकरा ते एक या वेळेत गायनाचे क्‍लास आणि पुन्हा सायंकाळी क्‍लास असा त्यांचा दिनक्रम ठरला आहे. महाद्वार रोडवर त्यांचे जेरे टेलर्स म्हणून दुकान आहे; मात्र ते सर्वाधिक रमतात ते संगीतसेवेतच. कागलकर संगीत विद्यालयाच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. 

संगीत विशारदांची परंपरा 
श्री. जेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीसहून अधिक शिष्य संगीत विशारद झाले. त्यात स्मिता गोसावी, विभावरी बाकरे, सुनीता कुलकर्णी, मनीषा माने, मंजिरी घोलकर, मधुमती पाटील, शर्वरी गोसावी, संजय साने, राधिका ठाणेकर आदींचा समावेश आहे. त्याशिवाय शास्त्रीय व सुगम संगीत विशारदही अनेक शिष्य झाले. त्यामध्ये राधिका पंडितराव, छाया जोशी, चित्रा कुलकर्णी, छाया कानकेकर आदींचा समावेश आहे. एकूणच वयाच्या बासष्टीतही श्री. जेरे यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल असाच आहे. आजही अनेक ठिकाणी त्यांच्या गायनाच्या मैफली रंगतात. आठ वर्षांच्या मुलापासून 83 वयापर्यंतच्या ज्येष्ठांना आजवर त्यांनी शास्त्रीय गाणं शिकवलं आहे. विशेष म्हणजे हा माणूस इतका साधा, की त्यांच्याकडे पाहिलं की या साऱ्या गोष्टी कुणाला पटणारही नाहीत; हे मात्र नक्की. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com