
कोल्हापूर : ती नवव्या इयत्तेत शिकते. तिला विज्ञानकथा वाचायला आवडतात. विशेषतः इंग्रजीमधील. लॉकडाउन काळात वाचनाबरोबरच तिने लिखाणाचा प्रयत्न केला. त्यातूनच तिला एक विषय सुचला आणि "द नेक्स्ट ऍडव्हेंचर' ही विज्ञानकादंबरी आकाराला आली. इंटरनेटवरून माहिती घेऊन चेन्नईतील एक्स्प्रेस पब्लिकेशनशी तिने स्वतंत्रपणे ई-मेलद्वारे संवाद साधत कादंबरी प्रकाशित करण्याचेही ठरवले. चार दिवसांपूर्वी तिची कादंबरी तयार होऊन तिच्या हाती पडली. कादंबरी घरी पोचल्यावरच तिच्या आई-बाबांना ही माहिती समजली. ताराबाई पार्कात राहणाऱ्या या पोरसवदा कादंबरी लेखिकेचे नाव आहे अपर्णा कस्सा.
कोरोनाचा धोका लक्षात घेता फेब्रुवारीपासूनच शाळा बंद होत्या. अपर्णासुद्धा घरीच होती. संपूर्ण मार्च तिने विविध पुस्तके वाचण्यात, स्केचेस् रेखाटण्यात व्यतित केला. याच दरम्यान एका साहसी कथेची तिच्या मनात बांधणी होत होती. ती एप्रिलमध्ये साहसी कथा कागदावर उतरवत गेली. संवादरूपाने कथेतील एकेका पात्राला बोलत करत गेली. मेच्या सुरवातीस कादंबरी लिहूनही झाली. ही कादंबरी प्रकाशित व्हावी, असे तिला मनोमन वाटत होते. त्यासाठी प्रकाशन कसे करायचे, याचीही माहिती ती मिळवत होती. इंटरनेटवर शोधून तिने ऑनलाईन पद्धतीनेही पुस्तक प्रकाशित करता येते याची माहिती मिळवली. त्यासाठी तिने कादंबरीतील मजकूर लॅपटॉपवर टाईप करण्यास सुरवातही केली. हा मजकूर तिने ई-मेलच्या माध्यमातून विविध पब्लिकेशन्सला पाठवला.
अवघ्या चार पाच दिवसांतच चेन्नईतील एक्स्प्रेस पब्लिकेशनने तिला ई-मेलव्दारे संपर्क साधला. ही कादंबरी प्रकाशित करण्याची तयारी दर्शवली. त्याचा करारही ऑनलाईन पद्धतीनेच झाला. ड्राफ्ट झाल्यानंतर कादंबरीचे मुखपृष्ठ कसे असावे, याची माहिती प्रकाशन संस्थेने मागितली. त्याचे मुखपृष्ठही तिने चित्राच्या माध्यमातून साकारले. लॉकडाउनमधील केवळ दोन महिन्यात हा सारा व्याप तिने पूर्ण केला. अपर्णाचे वडील डॉ. विजय कस्सा, आई तेजस्विनी, आजी विठाबाई व आजोबा दिगंबर यांचे तिला विविध उपक्रमांमध्ये प्रोत्साहन असते. तिची ही कादंबरी ऍमेझॉन व नोशन प्रेसवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
लॉकडाउनमध्ये शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मोकळा वेळ होता. सुरवातीला ट्रॅव्हल ब्लॉग असणारे यूट्यूब चॅनेलही सुरू केले होते. मात्र एखादी कथा लिहावी, असे वाटत होते. एप्रिल व मेमध्ये मी पूर्णवेळ कादंबरी लिहिली. चेन्नईतील प्रकाशन संस्थेने ती प्रकाशितही केली. ही कादंबरी एका साहसी विज्ञान कथेवर आधारित आहे.
- अपर्णा कस्सा, शाळकरी लेखिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.