esakal | जिल्हाधिकाऱ्यांचा "डोस' जयसिंगपुरला पडला लागू

बोलून बातमी शोधा

Vaccination Accelerated In Jaisingpur Kolhapur Marathi News

जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेतील लोकसहभागाबद्दल नाराजी व्यक्त करून फटकारल्यानंतर पालिका प्रशासनासह नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा "डोस' जयसिंगपुरला पडला लागू
sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेतील लोकसहभागाबद्दल नाराजी व्यक्त करून फटकारल्यानंतर पालिका प्रशासनासह नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. पालिकेतील जवळपास सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी मनावर घेत लसीकरण मोहिमेत सक्रिय झाले आहेत. यामुळे शहरातील लसीकरणात झपाट्याने वाढ झाल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले असून, प्रशासनासह नगरसेवकही यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर नगरसेवकांकडून प्रबोधन सुरू आहे. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत लसीकरणाची माहिती घेतली. यानंतर पालिकेत अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी लसीकरणाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादाबद्दल त्यांना धारेवर धरत कर्तव्याची जाणीव करून दिली. लोकांच्या दारात मते मागायला जाता तसे लसीकरणासाठीही जा. लोक मेल्यानंतर नगरसेवकांना जबाबदार धरावे का? असे जिव्हारी लागणारे वक्तव्य केल्यानंतर शहरात जनजागृतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याचे चांगले परिणाम दिसू लागले असून शहरात उच्चांकी लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. 

अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांचे कौतुक व्हावे असे कार्य सुरू असून यामुळे पालिकेत मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. कोरोनाच्या संकटात आता अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे शहरात 4,830 जणांनी लस घेतली आहे. नगरसेवकांनी सोशल मीडियासह प्रभागात घरोघरी जात लसीकरणाबद्दल जागृती करण्याचा धडाका लावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर शहरात लसीकरण मोहिमेने गती घेतली असून मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मोहिमेला बळ दिले जात आहे. 

आता जिल्हा प्रशासनाची जबाबदारी 
जिल्हाधिकाऱ्यांनी अल्प लसीकरणाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी यात आघाडी घेत अधिकाधिक लसीकरणासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

काही नगरसेवक अलिप्त 
शहरात लसीकरणाचा आलेख वाढविण्यासाठी प्रशासन आणि नगरसेवक प्रयत्नशील आहेत. सोशल मीडियासह रस्त्यावर उतरून त्यांचे हे काम सुरू असताना काही बोटांवर मोजण्याइतके नगरसेवक मात्र या मोहिमेपासून अलिप्त आहेत. साडेचार वर्षांपासून गायब असणारे हे नगरसेवक या मोहिमेतही गायब आहेत. ही बाब चर्चेत आली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur