esakal | सांगली, मिरजेला बस परत; कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली, मिरजेला बस परत; कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त

सांगली, मिरजेला बस परत; कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अथणी : महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कागवाड सीमा तपासणी नाक्यावर कडक तपासणी करण्यात येत आहे. येथून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लसीकरण अथवा आरटी-पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. ते नसल्याने बससह प्रवाशांना महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे.अथणी व कागवाड तालुक्यात सांगली, मिरज, जत, कवठेमहांकाळला जोडणाऱ्या रस्त्यांवर परत सीमा तपासणी नाके उभारले आहेत.

महाराष्ट्रातून येणाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची केली आहे. महाराष्ट्रातील सीमाभागात वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सांगली, मिरजहून येणारी वाहने आरटी-पीसीआर व लसीकरण प्रमाणपत्र नसल्यास परत पाठविण्यात येत आहेत. कागवाड सीमा तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. अथणीचे मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर यांनी नाक्यास भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

हेही वाचा- आंतरजातीय लग्नाने मुलीच्या वडिलांचा संताप; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल

महाराष्ट्रातून विनातपासणी कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश दिले.अथणी व कागवाड तालुक्यातील अनेक गावात टास्कफोर्सची स्थापना केली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातून येणाऱय़ांवर कडक नजर ठेवली जात आहे. कोरोनासह डेल्टाप्लसचे संक्रमण रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात येत आहे. संभाव्य लाटेपासून लहान मुलांना जपण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून केले जात आहे.

खिळेगाव-कवठेमहांकाळ, अनंतपूर-जत, डफळापूर, बाळीगेरी-गुगवाड, मंगसुळी-आरग, कागवाड-गणेशवाडी, मुचंडी-कोटलगी, शिरूर-सलगर येथे तपासणी नाके आहेत. अनेक चोर रस्ते असून तेथे खड्डे खणून वाहतूक बंद केली आहे. तालुका प्रशासन व आरोग्य खात्याकडून जनजागृती सुरू आहे. धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. आरटी-पीसीआर अथवा लसीकरण प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकात कोणालाही प्रवेश न देण्याची सूचना सीमा तपासणी नाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱयांना केली आहे.

दुंडाप्पा कोम्मार,तहसीलदार, अथणी

loading image