

Vantara Elephant Treatment
esakal
Elephant Rescue Kolhapur : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिरातील मोनिका हत्तीणीवर उपचार करण्यासाठी गुजरातमधील वनताराचे सहा तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे. गेल्या २० दिवसांपासून हे पथक मोनिकावर उपचार करत असून, तिची प्रकृती सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मोनिकाच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, प्रजनन मार्गाशी संबंधित गुंतागुंतही निर्माण झाली आहे. त्यामुळे तिला स्वतःच्या पायावर उभे राहणेही शक्य होत नाही.
मोनिका २०१० पासून मंदिर संस्थानच्या देखरेखीखाली आहे. १ ऑक्टोबर रोजी तिची प्रकृती अचानक खालावली. डाव्या मागील पायाला दुखापत झाल्याने तिला उठता येत नव्हते. सुरुवातीला शिवमोग्गा आणि बंगळूर येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे शरीराचा भार उजव्या पायावर पडू लागल्याने त्या पायालाही सूज येऊन गंभीर जखमा झाल्या.
अखेर मंदिर संस्थानने २६ ऑक्टोबरला वंताराकडे मदत मागितली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वंताराचे तातडीच्या प्रतिसाद पथक उदगावमध्ये दाखल झाले. मोनिकाच्या डाव्या मागील पायाचे हाड मोडले असून, उजव्या मागील पायाच्या तळव्यावरील त्वचा नखांसह निघाली आहे. याशिवाय प्रजनन मार्गातील गंभीर गुंतागुंतीमुळे काही ऊती बाहेर आल्या आहेत. या दुखापतींमुळे तिला प्रचंड वेदना होत आहेत.
उपचारादरम्यान पायांवरील भार कमी करण्यासाठी पाण्यात उपचार करता यावेत, या उद्देशाने मंदिर परिसरात तलाव तयार करण्यात आला आहे. वेदना कमी करणे, जखमांवर उपचार करणे आणि मोनिकाला पुन्हा उभे करण्यासाठी डॉक्टरांचे पथक चोवीस तास प्रयत्नशील आहे.
मंदिर संस्थानचे पदाधिकारी यांनी सांगितले की, मोनिकाची प्रकृती सुधारण्यासाठी कर्नाटकातील तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले; मात्र अपेक्षित परिणाम मिळाला नाही. त्यामुळे वंताराची मदत घेण्यात आली. वंताराच्या तज्ज्ञांकडून सध्या विशेष वैद्यकीय उपचार सुरू असून, मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, नंदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीणीवर वंतारामध्ये १३ महिने उपचार करण्यात आले होते. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर ती नुकतीच परतली आहे. या घटनेनंतर अवघ्या ४५ दिवसांत उदगावमधील मोनिका हत्तीणीच्या उपचारासाठी पुन्हा वंताराचे पथक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.