
Sangli : हॉटेलमध्ये धुडगूस; अकरा अटकेत
सांगली - विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रमजवळ असणाऱ्या हॉटेल आर्यामध्ये धुडगूस घालणाऱ्या अकरा जणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. संशयित अकरा जणांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गणेश श्रीमंत पाटील (३४, वानलेसवाडी), बाबासाहेब ऊर्फ बापशा वसंत चव्हाण (३४, रा. वानलेसवाडी), विनायक बापू दुधाळ (३४, स्वामी समर्थ कॉलनी), जयकिसन ऊर्फ बबलू ज्ञानू माने (३१, वानलेसवाडी), मल्लाय्या येरतय्या मठपती
(२९, बेथेलियम नगर, मिरज), बिरू दिगंबर गडदे (२८, जत, सध्या चाणक्य चौक), राहुल मनोहर रूपनर-दुधाळ (२२, वानलेसवाडी), नदीम बादशाहा शेख (३५, गजराज कॉलनी), राजकुमार परशुराम पुजारी (३२, वानलेसवाडी),
अवधूत रंगराव दुधाळ (२१, वानलेसवाडी), नितीन लक्ष्मण शिंदे (३०, सांगलीवाडी) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी सोहेल शेख, अजित अलगुरे, राकेश वाठार यांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हसनी आश्रम परिसरातील हॉटेल आर्या परमिट रूम हे आकाश शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी महेश कर्णी यांच्याकडून भाडे तत्त्वावर चालविण्यास घेतले आहे.
२३ ला दुपारी आकाश शिंदे हॉटेलमध्ये असताना संशयित सात जण त्याठिकाणी आले. त्यांनी, ‘आम्हाला फुकट जेवण पाहिजे,’ असे म्हणत ५० हजारांची खंडणी त्यांनी मागितली. यावेळी शिंदे यांनी पैसे आणि जेवण देण्यास नकार दिला.
यावेळी संशयितांनी, ‘तू इथे धंदा कसा करतो हे बघतोच,’ असे म्हणत तेथून निघून गेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी शिंदे हे गणेश पाटील याच्याकडे झालेल्या घटनेबाबत जाब विचारल्यानंतर संशयिताने दमबाजी केली.
दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास हॉटेलमध्ये काहीजण लोखंडी रॉड घेऊन तोडफोड करत असल्याचे कामगार राजू सोनंद याने फिर्यादींना सांगितले.
फिर्यादी यांनी तातडीने सारा प्रकार सीसीटीव्हीत पाहिला. त्यावेळी गणेस पाटीलचे साथीदार हे दिसून आले.
त्यानंतर पावणेसातच्या सुमारास पुन्हा संशयितांनी हॉटेलमध्ये तोडफोड करण्यास सुरवात केली. संशयितांनी हॉटेलमधील दोन ते अडीच लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील २२ हजारांची रक्कमही चोरी केली.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली. त्यानंतर आता पुन्हा अकरा जणांना अटक केली.
पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, दरिबा बंडगर, सुनील पाटील, महमंद मुलाणी, संदीप घस्ते, भावना यादव यांचा कारवाईत सहभाग होता.