चित्रीचे पाणी पोहचायला लागले दुप्पट दिवस

Water From Chitri Dam This Year Gadhinglaj Arrived Late Kolhapur Marathi News
Water From Chitri Dam This Year Gadhinglaj Arrived Late Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : चित्री मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पहिले रोटेशन 6 फेब्रुवारी रोजी सुरू झाले. हिरण्यकेशी नदीपात्रातील खोत बंधाऱ्यापर्यंत हे पाणी पोहचण्यासाठी 2 मार्चचा दिवस उजाडला. याच दिवशी चित्रीतील विसर्ग बंद करण्यात आला. निलजी बंधाऱ्याखालील नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणी पोहचण्यासाठी पहिल्यांदाच 13 ते 15 ऐवजी 26 दिवसांचा कालावधी लागला. यंदा उशीरा सुरू केलेले आवर्तनही याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. 

जानेवारीच्या मध्यावधीनंतर निलजी बंधाऱ्याखालील नदीचे पात्र पुरते कोरडे पडले होते. पश्‍चिमेकडील बंधाऱ्यात पाणी शिल्लक असतानाही त्यातील पाणी पाटबंधारे विभागाने पूर्वेला सोडले नाही. या भागातील नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर पाटबंधारेने 6 फेब्रुवारीला थेट चित्रीतील पाण्याचाच विसर्ग सुरू केला.

कोरड्या पात्रामुळे पाणी संथगतीने पुढे गेले. यामुळे पहिल्या रोटेशनचा कालावधी लांबला. परतीच्या पावसामुळे शेतीसाठीचा उपसा कमी झाला. परिणामी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पावसाळ्याचे अडविलेले पाणी शिल्लक राहिले. पाण्याचा वापर कमी झाल्याने पावसाळ्यात साठवलेले पाणी जानेवारीपर्यंत पुरले. 

यंदा हिरण्यकेशी नदीतील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. नदीत पावसाचे पाणी शिल्लक असतानाही वेळेत पूर्वेला सोडले नाही. ज्यावेळी पाणी सोडले तेंव्हा पात्र पुरता कोरडा पडला होता. यामुळे चित्रीतून सोडलेले पाणी जास्त लागले.

पात्रात पाणी असतानाच विसर्ग सुरू केला तर खोत बंधाऱ्यापर्यंत पाणी जाण्यास 12 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र पहिल्याच रोटेशनला 26 दिवसांचा कालावधी लागला आहे. यावरुनच पाटबंधारे विभागाचा कारभार लक्षात येतो.

स्थानिक शाखा अभियंत्यांना अजूनही या पदाचे चार्जपट्टी न मिळाल्याने त्यांच्याकडील अधिकाराला मर्यादा येत आहेत. ज्यांच्याकडे इथला चार्ज आहे, त्या अधिकाऱ्यांकडे तुर्केवाडी शाखेचीही सूत्रे आहेत. यामुळे प्रत्यक्ष नदी पात्रात काय परिस्थिती आहे, याची अचूक माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. याचाच परिणाम पाणी नियोजनावर होत आहे. 

1407 एमसीएफटी शिल्लक 
पहिल्या रोटेशनसाठी 430 एमसीएफटी पाणी लागले. आता चित्रीत 1407 एमसीएफटी पाणी शिल्लक आहे. राखीव साठा वगळून शिल्लक पाण्याचे तीन रोटेशन होतील. गतवर्षी जानेवारीत पहिले रोटेशन सोडले होते. यंदा मात्र 15 दिवस उशिराने पहिले रोटेशन सोडले. याचाही परिणाम कालावधी लांबण्यावर झाला आहे. पाण्याचा अनावश्‍यक वापर टाळण्यासाठी पाटबंधारेने चित्रीतील पाणी विसर्गाचे नियोजन केल्याचे शाखा अभियंता एन. डी. मळगेकर यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com