esakal | सांगली, मिरजेत बाप्पांचे जल्लोषात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली, मिरजेत बाप्पाचे जल्लोषात स्वागत

सांगली, मिरजेत बाप्पाचे जल्लोषात स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: कोरोनाच्या सावटातही गणेशनगरीत प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा आणि टाळ-मृदंगाचा गजरही पाहायला मिळाला. सांगली, मिरज शहरातील आणि उपनगरातील रस्ते गणरायाच्या स्वागतासाठी फुलून गेले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजर सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत ऐकण्यास येत होता. घरगुती गणपतीची दुपारपर्यंत प्रतिष्ठापना करण्यात आली. तर अनेक मंडळांनी नियमांचे पालन करत साधेपणाने ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली.

हेही वाचा: जमिनीवरील अतिक्रमणाबाबत वीरजवानाचे कुटुंबीय थेट मुख्यमंत्र्यांकडे

दोन वर्षापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरानंतर गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. तर गतवर्षी कोरोनाचे सावट होते. या सावटामुळे शासकीय नियमांचे पालन करत विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाही कोरोनाचे सावट कायम असून शासनाने उत्सवाच्या निमित्ताने निर्बंध लागू केले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमावली लागू केली आहे. मूर्तीची उंची निश्‍चित केली आहे. कोरोनाच्या सावटामुळे अनेक मंडळांनी यंदाही उत्सव रद्द केला आहे. तर परंपरा खंडीत होऊ नये म्हणून अनेक मंडळानी सार्वजनिक रस्त्याऐवजी खासगी जागेत साधेपणाने सजावट करून त्यामध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे आज दिसून आले.

कोरोनाचे सावट असले तरी आज गणरायाच्या आगमनानिमित्त उत्साहाला उधाण आल्याचे चित्र होते. बच्चे कंपनी सकाळपासून लाडक्या बाप्पांना घरी आणण्यासाठी उत्सुक होती. अनेक कुटुंबानी गणेशमूर्तीचे बुकींग अगोदरच करून ठेवले होते. मंडळांनी देखील मूर्तीं ‘फिक्स’ करून ठेवली होती. आज गणरायाच्या स्वागतानिमित्त सांगलीनगरी अर्थात गणेशनगरी सजली होती.

शहरातील कर्मवीर चौकाजवळील सर्व्हीस रस्त्यावर यंदा मोठ्या संख्येने स्टॉल लागले होते. वाहतूक नियंत्रणासाठी तेथे सकाळपासून पोलिस फौजफाटा तैनात होता. तसेच सजावटीचे स्टॉल, फळांचे गाडे, दुर्वा आदी साहित्य विक्रीचे स्टॉल मांडण्यात आले होते.

ताशाचा कडकडाट, टाळ-मृदंगाचा गजर असा साधेपणा दिसून आला. पायी चालत, दुचाकी, चारचाकीसह गणेश मंडळे छोट्या-मोठ्या टेम्पोतून गणरायाला नेण्यासाठी आले होते. अनेकजण पारंपारिक वेशभूषेत होते. कर्मवीर चौक परिसर, विश्रामबाग परिसर, मारूती रस्ता, गावभाग, गणपतीपेठ आदी गजबजलेल्या परिसरासह उपनगरात गणरायाच्या स्वागतासाठी गर्दीला उधाण आले होते. कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून विघ्नहर्त्याचे स्वागत करण्यात आले.

विघ्न दूर करण्याचे साकडे

यंदा सलग दुसऱ्या वर्षीही उत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी उत्साह काही कमी नव्हता. सुखकर्ता व दु:खहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विघ्नहर्त्याकडे अनेकांनी कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकड घातले.

loading image
go to top