
कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरातच बसून राहिले पाहिजे, असे नाही. गल्लीत, चौकात, तालमीच्या कट्ट्यावर गप्पांचा फड रंगवत कसेही बसले तरी चालते, अशी कोल्हापुरात अनेकांनी समजूत करून घेतली आहे.
त्यामुळे गप्पांचे फड, कॅरम बोर्ड, पत्त्यांची पिसनी उशिरापर्यंत सुरू आहे; पण अशा गप्पांच्या फडाच्या ठिकाणीही कोरोना संसर्ग होऊ शकतो, हे वनवासमाची (ता. कराड) येथील घटनेमुळे स्पष्ट झाले आहे आणि आपल्याला काय होतंय? या समजुतीत असलेल्या कोल्हापूरकरांना तो एक गंभीर इशारा ठरला आहे. किंबहुना, राज्यभर वनवासमाची ही कोरोना संसर्गाची घटना मानली जात आहे.
वनवासमाची या छोट्या गावात लॉकडाउन बऱ्यापैकी जरूर पाळले होते. पहिल्या पहिल्यांदा सगळे एकमेकांपासून लांब राहिले. मग हळूहळू गप्पा मारत एकत्र बसू लागले. गावातल्या गावात जरा एकत्र येऊन बसले तर त्याला काय होतंय, अशी त्यांनी समजूत करून घेतली. महिलाही धान्य निवडत, भाजी खूडत गप्पा मारत एकत्र बसू लागल्या. आपल्या एवढ्या छोट्या गावात कोरोना कशाला येतोय? या समजुतीतच सारे जण होते.
गावाबाहेर काही निमित्ताने तुरळक येणे जाणे सुरू होते. म्हणजेच इतरत्र ज्या पद्धतीने आपापल्या समजुतीप्रमाणे लॉकडाउन पाळला गेला, तशा पद्धतीने वनवासमाची गावानेही लॉकडाउन पाळला; पण एक दिवस गावातल्याच एकाला लक्षणे दिसली. त्याची तपासणी झाली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे छोटे गाव या अहवालामुळे हादरले. मग तो पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांच्यासोबत रोज गावातल्या कट्ट्यावर गप्पा टप्पा मारत बसत होता, त्यांचीही तपासणी केली आणि एक नव्हे, दोन नव्हे 27 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मोठी धावपळ उडाली. गाव बंद झाले. जे पॉझिटिव्ह होते, त्यांच्याशी संबंधित सर्वांची तपासणी सुरू झाली. आता गावातला एक माणूस घराबाहेर पडत नाही. गाव कधीच बंद झाले आहे. जे जीवनावश्यक आहे ते प्रत्येक घरात घरपोच केले जात आहे. गावावर भीतीचे मोठे सावट आहे.
वनवासमाची सारखाच प्रकार कोल्हापुरात सुरू आहे. सोशल डिस्टन्सचा ज्याने त्याने आपल्या सोयीनुसार अर्थ लावून घेतला आहे. आता तर लॉकडाउन शिथिल झाले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स संपलाच आहे.
पहिल्या पहिल्यांदा सॅनिटायझर खिशात ठेवून फिरणाऱ्यांनी आता सॅनिटायझरचा वापर थांबवला आहे. नाक उघडे ठेवून तोंडाला मास्क बांधले जात आहेत. मास्क बांधला की अनेकांना म्हणे गुदमरल्यासारखे वाटत आहे. काहींची थुंकायची अडचण होत आहे. गल्लीतले बाक, तालमीचे कट्टे, चौकातल्या मोक्याच्या जागेवर गप्पा रंगत आहेत. मोबाईल बघण्यात दंग अशा अवस्थेत बसलेले असतात. तोंडावरचा मास्क नावालाच असतो. कोरोना गेला, आपल्याकडे तो काही येत नाही, अशा समजुतीत बहुतेकजण आहेत. या परिस्थितीत वनवासमाची गावासारखा एखादा संसर्ग झाला तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ शकणार आहे; पण कोल्हापुरात कोणी कोणाला सांगायचे? हाच प्रश्न आहे.
तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात धुणे, अंतर राखून वावरणे हे नियम नाहीत. ही काळाची गरज आहे. दंड करून, कारवाई करून ते लोकांनी पाळावेत, अशी आमची अपेक्षा नाही. हा संसर्ग टाळायचा असेल तर स्वतःची जबाबदारी आवश्यकच आहे. कोरोना संसर्गाचे सावट आपल्या आजूबाजूला नक्की आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.