
कोल्हापूर ः कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना सीपीआर रुग्णालयावर ताण येतो आहे. महिनाभरात अनेक उणिवा दिसल्या आहेत. प्रभारी अधिष्ठातांच्या "कडक' सूचनांमुळे वरिष्ठ डॉक्टरही हवालदिल आहेत. अशा स्थितीत अधिष्ठाता म्हणून नांदेडचे डॉ. चंद्रकांत मस्के यांची नियुक्ती झाली. मात्र, गेले तीन दिवस तेही "नॉट रिचेबल' आहेत. त्यामुळे नव्या अधिष्ठातांच्या आगमनाविषयी संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनाकाळात अधिष्ठातासारख्या जबाबदार पदावर नियुक्ती होऊनही डॉ. मस्के यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सीपीआर रुग्णालयात उपचार सेवा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पुरवली जाते. अधिष्ठातापदावर चार महिन्यांपूर्वी डॉ. मीनाक्षी गझभिये होत्या. त्यांनी कोरोना उपचारविषयक सुविधा सक्षम केल्या. तक्रारीवरून त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी धुळ्याचे डॉ. जयप्रकाश रामानंद येणार होते. त्यांनाही विरोध झाला. त्यानंतर येथे डॉ. आरती घोरपडे यांची नियुक्ती झाली.
महिनाभरात "सीपीआर'च्या अंतर्गत कारभारातील नियम व अटी इतक्या कडक केल्या, की डॉक्टरांना उपचारसेवेबाबत सकारात्मक बोलणे व निर्णय घेण्यावर मर्यादा आल्या. ठराविक डॉक्टरांना जादा काम, काही जण निवांत, कर्मचाऱ्यांचीही अशीच स्थिती झाली. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तातडीने बोलायचे झाल्यास अधिष्ठाता बहुतेक वेळा मीटिंगमध्ये असल्याने बोलणे होणेही मुश्कील झाले. याविषयी सीपीआर वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.
महिनाभरात तपासणीची संख्या मात्र वाढली, अहवाल वेळेत येऊ लागले, उपचारपूरक मशिन बसवली, अतिगंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार झाला. याच वेळी बाधित मृतांचा आकडा वाढला. बाधित वृद्धाला उपचारासाठी वेळेत बेड मिळाला नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला, हेही अपयश ठळक झाले.
नव्या अधिष्ठातांविषयी...
एवढी गंभीर स्थिती असूनही अनुभवी अधिष्ठातांना पदभार स्वीकारण्यास तीन दिवसांचा विलंब झाला. अजूनही ते नेमके कधी येणार, याबाबत अधिकृत माहिती नाही. डॉ. मस्के यांच्याशी संपर्क साधला अशात तेही फोन उचलत नाहीत. त्यामुळे डॉ. मस्के पदभार स्वीकारणार, की वैद्यकीय रजेवर जाणार, की बदलीच रद्द करणार याविषयी चर्चा सुरू आहे.
-संपादन ः यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.