esakal | लॉकडाऊनचा सदुपयोग करत प्रणवने केले दुसरे वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

World record for weighing football on the nose by pranav bhopale kolhapur

नाकावर फुटबॉल तोलण्याचा विश्‍वविक्रम
प्रणव भोपळेचे दुसरे रेकॉर्ड; लॉकडाउनमधील वेळेचा केला सदुपयोग

लॉकडाऊनचा सदुपयोग करत प्रणवने केले दुसरे वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : फ्रीस्टाईल फुटबॉलर प्रणव भोपळे याने आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली. या नोंदीचे प्रमाणपत्र प्रणवला नुकतेच प्राप्त झाले. प्रणवचे हे दुसरे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. फ्री स्टाईल फुटबॉलसारख्या खेळाला स्वतःचे करियर बनवणाऱ्या प्रणव भोपळेने वर्षभरामध्ये दोन जागतिक विक्रमांना गवसणी घातली. प्रणवने नाक आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. असा प्रकारचा विक्रम करणारा प्रणव जगभरातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे जगभरातील विक्रमांची नोंद घेतली जाते. या विक्रमामध्ये प्रणवच्या या आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. प्रणवने एक मिनिटामध्ये ८१ वेळा नाकावर आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स करण्याचे रेकॉर्ड बनवले. प्रणव तीन वर्षांपासून फ्री स्टाईल फुटबॉलचा सराव करत आहे. सोबतच तंत्रे आत्मसात करत आहे. लॉकडानमध्ये प्रणवने या खेळात अधिक मेहनत घेत लागोपाठ दोन जागतिक विक्रम नावावर केले. अनोख्या विक्रमासाठी १० ऑगस्ट २०२० ला त्याने प्रात्यक्षिक दिले होते. हे जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित झाल्याचे प्रमाणपत्र त्याला काल (ता. ७) प्राप्त झाले. त्याला त्याच्या आई, वडिलांसह भाऊ, वडणगे फुटबॉल क्‍लब आणि सावली केअरच्या द ब्रिज या उपक्रमाची साथ मिळाली.

हेही वाचा- उचंगी धरणाबाबत बळजबरी न करण्याची धरणग्रस्तांची मागणी -

फ्री स्टाईल फुटबॉलमध्ये लौकिक
प्रणवने एका वर्षांमध्ये फ्री स्टाईल फुटबॉलमध्ये दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या विक्रमांमुळे कोल्हापूर फ्री स्टाईल फुटबॉलमध्ये अधिक नावलौकिक मिळवेल, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या हेतूने खेळ सुरू केला. यातच विविध माध्यमांतून खेळातील नवनवीन तंत्रे आत्मसात करण्यास सुरवात केली. याचा फायदा जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित कारण्यासाठी झाला असून यामुळे अधिक जोमाने तयारी करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
- प्रणव भोपळे; फुटबॉलपटू

संपादन- अर्चना बनगे

loading image