esakal | महाराष्ट्रातल्या आखाड्यातील मल्लांचा शड्डू घुमणार कधी ?
sakal

बोलून बातमी शोधा

wrestler demand to maharashtra government started ground

कुस्ती महाराष्ट्राचे वैभव. महाराष्ट्राच्या तांबड्या मातीने देशाला अनेक मल्ल दिले; परंतु कोरोना महामारीत ही शाळाच बंद पडली.

महाराष्ट्रातल्या आखाड्यातील मल्लांचा शड्डू घुमणार कधी ?

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर - कोरोना महामारीत लॉकडाउन जाहीर झाला आणि धावत्या जगाचे चक्र स्तब्ध झाले. कोरोना संसर्गाची भिती लक्षात घेता कुस्ती आखाडे, व्यायामशाळा, क्रीडा मैदानांना टाळे ठोकण्यात आले आणि खेळाडू घरात लॉकडाउन झाले.

कोरोनाच्या प्रभावाला जवळपास पाच महिने उलटले असले तरी महाराष्ट्रातले कुस्ती आखाडे मात्र बंदच आहेत. सध्या केंद्र सरकारने जीमखाने, क्रीडा मैदाने खुली करण्यासंदर्भात मुभा दिली असली तरी राज्य सरकारने मात्र बंदी आदेश कायम ठेवला आहे. राज्यातले मल्ल, वस्ताद मंडळी आखाडे सुरू करण्याची मागणी करत आहेत. 

कुस्ती महाराष्ट्राचे वैभव. महाराष्ट्राच्या तांबड्या मातीने देशाला अनेक मल्ल दिले; परंतु कोरोना महामारीत ही शाळाच बंद पडली. पैलवानांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या कुस्ती स्पर्धा, यात्रा-जत्रा, ऊरसात होणारे फड रद्द झाले आणि हजारो मल्लांना गावाकडे परतावे लागले. लॉकडाउन काळात मल्लांवर उपासमारीची वेळ आली. कोरोना लवकर संपेल याची वाट पाहत अनेक मल्लांनी कुस्तीला रामराम ठोकल्याचे दिसते. डिसेंबरमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा तसेच मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नियोजित आहे. शालेय स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा देखील याच काळात असतात; परंतु मल्लांचा सरावच नसल्याने स्पर्धा कशा खेळायच्या हा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. 

उत्तर भारतातले आखाडे सुरू 
अनलॉकनंतर उत्तर भारतातले आखाडे सुरू झाले आहेत. ऑलिम्पिकसाठी भारतीय कुस्ती महासंघाने सराव शिबिरेही सुरू केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काही मल्लांनी सरावासाठी दिल्ली, पंजाब, हरियानाकडे प्रस्थान केले; परंतु अनेकांना ही बाब परवडणारी नसल्याने त्यांनी घरीच सराव करण्यास सुरवात केली आहे. 
 
बंदिस्त आखड्यामुळे संसर्गाची भीती कमीच 
कुस्तीचे निवासी आखाडे बंदिस्त असतात. आखाड्यातील मल्लांचा खूप कमी प्रमाणात बाहेरील लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत सराव करता येईल. त्यामुळे शासनाने लवकर कुस्तीचे आखाडे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मल्ल तसेच कुस्ती संघटनांकडून होत आहे. 

हे पण वाचा -  धक्कादायक -  तिचा अहवाल निगेटिव्ह मात्र मृतदेह तब्बल अकरा तास घरीच 


महाराष्ट्रातून ऑलिंम्पिकसाठी मल्ल पाठवण्याची तयारी आम्ही करत आहोत; पण कोरोनाच्या संकटात असेच आखाडे बंद राहिले तर मल्लांसह महाराष्ट्राचे देखील नुकसान होणार आहे. 
- काका पवार, अर्जुनवीर पुरस्कार विजेते 

कोरोनामुळे सर्व कुस्ती स्पर्धा रद्द झाल्या. त्यामुळे हंगाम वाया गेला आणि मल्लांची आर्थिक कोंडी झाली आहे. लाखांचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्‍न आहे. काही महिन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे तरी सरकारने लवकर आखाडे खुले करत परवानगी द्यावी. 
- माऊली जमदाडे, महान भारत केसरी           

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top