esakal | "स्वामीकारां'चे लेखनिक कुंभार यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Writer Pundurang Kumbhar No More Kolhapur Marathi News

स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडूरंग कुंभार (वय, 81, रा. कोवाड, ता, चंदगड) यांचे आज राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते. खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. 

"स्वामीकारां'चे लेखनिक कुंभार यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोवाड ः स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडूरंग कुंभार (वय, 81, रा. कोवाड, ता, चंदगड) यांचे आज राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते. खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. 
निधनाची बातमी समजताच कोल्हापूर, बेळगाव येथील साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून अत्यंदर्शन घेतले. सन 1958 पासून पांडूरंग कुंभार स्वामीकार रणजित देसाई यांच्या संपर्कात आले. त्यांच्या रेखीव व वळणदार अक्षरांनी स्वामीकार भारावून गेले. यामुळे अल्पावधित त्यांची स्वामीकारांचे लेखनिक म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या रेखीव अक्षरांच्या हस्तलिखीतांची अनेक प्रकाशकांनाही भुरळ पडली होती. आपल्या लेखनिकासाठी स्वामीकारांनी तीन पुस्तकांच्या अर्पण पत्रिका लिहिल्या होत्या. यावरून स्वामीकारांचे त्याच्यावरील अलोट प्रेम दिसून येते. "स्वामी' कादंबरीच्या लेखनीला सुरवात झाली आणि कुंभार यांना प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीची आर्डर आली. गडहिंग्लज तालुक्‍यातील तेरणी गावात ते रूजू झाले. नोकरी सांभाळत त्यांनी स्वामीकारांचे लेखनिक म्हणून काम केले. स्वामीकारांच्या कादंबऱ्यांचे लेखन करताना कुंभार यांच्यात लपलेला साहित्यिक जागा झाला. त्यातून "वाळवण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह तयार झाला. कथासंग्रहात अडकून न बसता कुंभार यांनी कादंबरीचे लेखन करायला सुरवात केली. ग्रामीण साहित्याचा बाज असलेली "गावकूस' ही कादंबरी त्यांनी पूर्ण केली. आतापर्यंत कुंभार यांचे चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, तीन संपादीत पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 1998 साली ते सेवा निवृत्त झाले. कोवाडमधील स्वामीकार रणजितदादा सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात त्याचे मोठे योगदान होते. वाचनालयाचे ते सल्लागार म्हणून काम पाहत होते. चंदगड तालुका साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष होते. बेळगाव येथे प्रकाशित झालेल्या "ज्वाला"या दिवाळी अंकाचे ते अनेक वर्षे सहसंपादक होते. दोन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

loading image