esakal | Coronavirus : जर्मनीसे आया मेरा गेस्ट; पाहा पुढे काय घडले ?
sakal

बोलून बातमी शोधा

a young man Directly from Germany for visit to Nerle village

डायरेक्‍ट 'जर्मनी'हून एक युवक नेर्ले गावातील आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.

Coronavirus : जर्मनीसे आया मेरा गेस्ट; पाहा पुढे काय घडले ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर्ले (सांगली) - डायरेक्‍ट 'जर्मनी'हून एक युवक नेर्ले गावातील आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. विशेष म्हणजे त्याला कोरोनाच झाला आहे या गैरसमजामुळे लोकांत चर्चा रंगली. शेवटी प्रशासनाने वेळीच धाव घेत आरोग्य केंद्राने त्या युवकाची तपासणी करीत 'होम कोरंटाइन' शिक्का मारला. त्याला त्याच्या घरी जाण्याचा सल्ला दिला. 

नेर्ले (ता. वाळवा) येथे आज सकाळी 11 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उलट सुलट चर्चाही रंगली. नातेवाईकांच्या अडेलतट्टूपणामुळे प्रशासनही हतबल झाले होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभाग, सदस्य व पोलिस यांनी नातेवाईक व युवकास मार्गदर्शन केले. त्यामुळे तो युवक आपल्या घरी मार्गस्थ झाला. 
हा युवक 27 वर्षीय युवक मुंबईत आपल्या वृद्ध आई-वडील यांच्या सोबत राहतो व तो जर्मनीत नोकरी करतो. आठ-दहा दिवसांपूर्वी तो जर्मनीहून विमानाने मुंबईत आला. मुंबईत आठ दिवस राहून तो नेर्ले येथील मामांकडे राहण्यासाठी आज पहाटे आला. यावेळी कोरोना सदृश युवक आल्याची अफवा गावात वाऱ्यासारखी पसरली. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली. यावेळी वाळवा तालुका विस्तार अधिकारी सुहास पाटील, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सागर शिंदे, कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, बिट हवालदार शिवाजी यादव यांनी त्या युवकाची व नातेवाईक यांची भेट घेऊन त्याला त्याच्या घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी आरोग्य विभागाने त्यांची वैद्यकीय तपासणीही केली. यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे आढळून आले. 

वाचा - टण टण वाजलं, मटण शिजलं...! कोल्हापुरात जनता कर्फ्यूच्या आधी हा बेत...  

घडलेल्या या प्रकारामुळे गावातील वातावरण मात्र दूषित झाले. लोकांनी लगेच विश्वास न ठेवता, खात्री करून बाहेरून येणाऱ्या पै-पाहुण्यांना घरी घेताना विचार करावा व तसे काही आढळल्यास डॉक्‍टर व ग्रामपंचायतला कळवावे, असे आवाहन करण्यात आले. या घटनेनंतर सरपंच छाया रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील, महेश पाटील, शरद बल्लाळ, माणिक पाटील व ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, डॉ. सागर शिंदे यांनी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांची तातडीची बैठक घेतली. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसावर पाळत ठेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व गावातील लोकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. जनता कर्फ्यू पाळावा. कोरोनाविषयी माहिती घ्यावी, अशी बैठकीत चर्चा झाली. कोरोनाबाबत स्वच्छता पाळावी, काही संशयास्पद वाटल्यास आम्हाला लगेच कळवावे, असे आवाहन डॉ. सागर शिंदे यांनी यावेळी केले. 

त्या युवकाला कोरोना नाही 

जर्मनीहून आलेल्या या युवकास कोरोना व्हायरसची लागण झाली नाही. मात्र तो परदेशातून आल्यामुळे त्याला घरीच राहण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे लोकांनी घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले.