esakal | कोल्हापुरात नाराजी; तरुणांचे थेट राहुल गांधी यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.

कोल्हापुरात नाराजी; तरुणांचे थेट राहुल गांधी यांना पत्र

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : प्रदेश कार्यकारिणीवरील निवडीवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेले नाराजीचे लोण आता जिल्ह्यापर्यंतही पोहोचले आहे. एकीकडे पक्ष कार्यकारिणीत तरुणांना संधी द्या, असे सांगितले जात असताना जिल्ह्यात मात्र तरुणांना डावलून पुन्हा ज्येष्ठांची वर्णी प्रदेश कार्यकारिणीवर लावली. शहराध्यक्ष पद बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या; पण त्याचेही भिजत घोंगडे कायम आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर झाली. यात जिल्ह्यातील तिघांची वर्णी लागली. राज्यभर या यादीवरून कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. काहींनी थेट खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून याची तक्रार केली आहे.

पक्ष कार्यकारिणीत तरुणांना संधी देण्यावरून देश पातळीवरील काँग्रेस नेत्यांत मतभेद आहेत. त्यातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. मुरली देवरा, सचिन पायलट यांसारखे पक्षातील नव्या दमाचे शिलेदारही नाराज आहेत. त्यातून बोध घेण्याऐवजी तरुणांना डावलून प्रदेशवर जिल्ह्यातून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे, ॲड. सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शशांक बावचकर यांची निवड करण्यात आली. ॲड. घोरपडे पक्षाचे निष्ठावंत आहेत. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. तौफिक मुल्लाणीसारख्या राबणाऱ्या कार्यकर्त्याला पदावरून हटवले. विद्याधर गुरबे, राहुल खंजिरे, सचिन चव्हाण यांच्यासारखे क्षमता असलेले, पक्षाचे पडेल ते काम करणारे कार्यकर्ते दुर्लक्षित झाले.

हेही वाचा: सावधान: ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात इचलकरंजी ; 25 हून अधिक तरुण

ॲड. बुद्धिहाळकर-पाटील यांनी उमेदीच्या काळात पक्षासाठी प्रचंड काम केले. युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह इतर अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची वर्णी लागली असली तरी त्यांनीही २००९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधातच त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पुन्हा ते पक्षात आल्यानंतर त्यांना पद बहाल केले. इचलकरंजीचे नगरसेवक शशांक बावचकर यांचे वडील पक्षांशी एकनिष्ठ असले तरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार प्रकाश आवाडे असो किंवा माजी आमदार सुरेश हाळवणकर त्यांना तोडीस तोड म्हणून बावचकर यांच्याऐवजी कार्यकारिणीत खंजिरे यांना संधी दिली असती तर त्यांचाही पक्ष कार्यातील उत्साह वाढला असता, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.

फक्त उघड कोणी बोलत नाही

अनेक वर्षे शहर अध्यक्ष म्हणून माजी महापौर प्रल्हाद चव्हाण काम करतात. जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून जर आमदार पी. एन. पाटील यांना बदलले जात असेल तर चव्हाण यांना पुन्हा संधी कशी, असाही प्रश्‍न पडतो. त्यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांच्याकडे क्षमता असूनही त्यांना ही संधी देऊन चव्हाण यांच्याच घरात हे पद ठेवण्याची संधी होती; पण त्यावरही निर्णय झालेला नाही. काँग्रेसमधील एकूणच या निवडीबाबत नाराजीचा सूर आहे. फक्त त्यावर उघड कोणी बोलत नाही एवढाच फरक.

loading image
go to top