लेह-लडाखच्या थंडीत कोल्हापुरी कॉफीची ऊब

सुधाकर काशीद
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोल्हापूर - हिचं नाव तन्वी कृष्णा जाधव. राहायला देवकर पाणंदमध्ये. बीटेक झाली. साहजिकच नोकरीला लागली. फक्त नोकरी एके नोकरी करेल तर ती तन्वी कसली. मग तिने काय केले? नोकरी सोडली आणि कॉफी शॉप सुरू केले आणि हे कॉफी शॉप कुठे रंकाळा चौपाटी किंवा ताराबाई पार्कात नव्हे तर चक्क देशाच्या एका टोकाला असलेल्या लेह लडाखमध्ये.

कोल्हापूर - हिचं नाव तन्वी कृष्णा जाधव. राहायला देवकर पाणंदमध्ये. बीटेक झाली. साहजिकच नोकरीला लागली. फक्त नोकरी एके नोकरी करेल तर ती तन्वी कसली. मग तिने काय केले? नोकरी सोडली आणि कॉफी शॉप सुरू केले आणि हे कॉफी शॉप कुठे रंकाळा चौपाटी किंवा ताराबाई पार्कात नव्हे तर चक्क देशाच्या एका टोकाला असलेल्या लेह लडाखमध्ये. ज्या लेह लडाखच्या वातावरणाचा उल्लेख झाला तरी अंगावर थंडीची लहर उमटते. तेथे तिचे कॉफी शॉप चालू झाले. आणि तिकडे गेली दोन वर्षे हे कॉफी शॉप तन्वी चालवत आहे. एक कोल्हापुरी मराठमोळी मुलगी लेहच्या गारठ्यात तिच्या कॉफीची ही ऊब जिद्दीने देत आहे. 

कृष्णा आणि सौ. वर्षा जाधव यांची ही मुलगी अभ्यासात तर हुशारच; पण सायकलिंगमध्येही तिला रस. तिची सायकलची धाव पन्हाळा-जोतिबा करता करता मनालीच्या खडतर वाटेपर्यंत जाऊन पोहोचली. ती सलग दोन-तीन वेळा केवळ सायकलिंगच्या निमित्ताने लेह लडाखला गेली आणि तिथल्या निसर्गाच्या प्रेमातच पडली. अतिशय गोड अशा तन्वीने चक्क लेहमध्ये यांगचेन डोल्या या तिथल्या काकूंनाच लळा लावला. या काकू तिला म्हणाल्या, ‘‘तन्वी तू इथेच माझ्या छोट्याशा सुंदर घरात कॉफी हाऊस सुरू कर.’’ तन्वीने त्या क्षणी होकार दिला. ती कोल्हापुरात परत आली. 

आई-वडिलांना सांगितले, की मी नोकरी सोडणार आणि लेहमध्ये कॉफी शॉप सुरू करणार! पोरीच्या डोक्‍यात हे काय नवे फॅड आले म्हणून आई-वडील काही क्षण बावरूनच गेले; पण पोरीच्या जिद्दीवर त्यांचा विश्‍वास होता. मग ते म्हणाले, ‘जे करायचे कर; पण त्यात यशस्वी हो.’

तन्वीने मग लेह गाठले. डोल्या काकूंच्या घरातच मेत्ता (मैत्री) या नावाने कॉफी शॉप सुरू केले. कॉफीबरोबरच स्वतःच्या कल्पनेप्रमाणे आरोग्यदायी व चवदार पदार्थही ती देऊ लागली. दूध आणि त्यात कोल्हापुरी गूळ घालून ती चॉकलेट बनवू लागली आणि तिच्या गूळ चॉकलेटची चव लेहमध्ये अनेकांच्या जिभेवर रेंगाळू लागली. 

तन्वीची कॉफी शॉपी लेहमध्ये झांगास्ती या मुख्य परिसरात आहे. ट्रेकर्स लेहच्या भौगोलिक, पर्यावरण, जैवशास्त्रीय अंगाने अभ्यासासाठी येणारे शास्त्रज्ञ, संशोधक तिचे ग्राहक आहेत. कॉफीचे घुटके घेत तिच्याबरोबर रोज गप्पांचा फड ते रंगवतात. लेहच्या वातावरणाचा अंदाज घेऊन ती मे ते नोव्हेंबर या कालावधीत कॉफी शॉप चालवते. एकदा पारा शून्य अंशाखाली आला की लेहचे चित्रच बदलते; मग पुन्हा आई-वडिलांना, मामा अभिजित साळोखे, मामी श्रद्धा साळोखे व इतर मित्र-मैत्रिणींना भेटायला कोल्हापुरात येते. आता ती आजोबांचे निधन झाल्याने कोल्हापुरात आली आहे आणि उद्या लेहकडे रवाना होणार आहे.

माझ्या कॉफी शॉपमधल्या चॉकलेटमध्ये कोल्हापुरी गूळ आहे. दूध आणि गुळाचे हे चॉकलेट खूप जणांच्या जिभेला चटक लावणारे ठरले आहे. मी लेहमध्ये कॉफी शॉप चालवते हे जरूर वेगळे आहे; पण ते फार मोठे आहे, असे मी मानत नाही. 
- तन्वी जाधव, 
कोल्हापूर

Web Title: Kolhapuri coffee shop in Leh-Ladakh special story