जगातले सर्वांत उंचीवरचे पोस्ट ऑफिस आहे कोठे ? कोल्हापूरकर पोहोचले तिथे

सुधाकर काशीद
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

जगातल्या सर्वांत उंचीवरच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी आपापल्या घराकडे म्हणजे कोल्हापूरकडे पत्रेही टाकली आणि त्यांनी आम्ही साहसी कोल्हापूरकर म्हणून आपली नोंद या पोस्ट ऑफिसच्या नोंदबुकात केली.

कोल्हापूर - जगातले सर्वांत उंचीवरचे पोस्ट ऑफिस १४ हजार ५६७ फूट उंचीवर आपल्या भारतात हिक्‍कीमला आहे. देशातले सर्वांत अधिक उंचीवरचे शेवटचे खेडे चितकूल ११ हजार ३२० फूट उंचीवर आहे. ही ठिकाणे हिमाचल प्रदेशात लाहूल व स्पीती व्हॅलीत आहेत. या ठिकाणी जायचं आणि तेही गिअर नसलेल्या मोपेडवरून असे या १२ जणांनी ठरवले आणि त्यात तीन महिला होत्या.

त्यांचा हा प्लॅन ऐकून बहुतेकांनी त्यांना वेड्यात काढले. गिअर नसलेल्या मोपेडवरून आणि तेही हिमाचल प्रदेशात म्हटल्यावर तुमच्या मोपेडचा आणि हाडांचा खुळखुळा होणार, अशीही शेरेबाजी सुरू झाली; पण या बारा जणांची जिद्द एवढी मोठी, की त्यांनी ११०० किलोमीटरची ही मोहीम पूर्ण केली. जगातल्या सर्वांत उंचीवरच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी आपापल्या घराकडे म्हणजे कोल्हापूरकडे पत्रेही टाकली आणि त्यांनी आम्ही साहसी कोल्हापूरकर म्हणून आपली नोंद या पोस्ट ऑफिसच्या नोंदबुकात केली.

गिअर नसलेल्या मोपेडवरून प्रवास

चंडीगडपासून त्यांनी प्रत्यक्षात मोपेडची सवारी सुरू केली; पण त्यांचा खडतर प्रवास खऱ्या अर्थाने सांगलीतून सुरू झाला. या रस्त्यावरून अनेक जण दुचाकीवरून एक साहस म्हणून जरूर प्रवास करतात; पण बहुतेकांकडे बुलेट किंवा मोठ्या ताकदीच्या दुचाकी असतात. यांनी मात्र गिअर नसलेल्या मोपेडवरून प्रवास सुरू केला व नेहमी या मार्गावर बुलेटचा ताफा पाहणाऱ्यांना त्यांनी धक्का दिला.

‘इंडियाज लास्ट विलेज’

मार्गातल्या उंच डोंगररांगांतून दगडगोट्यांचा थर असलेल्या रस्त्यावरून मार्ग काढत ते चितकूलला पोहोचले. चितकूल हे आपल्या देशातले सर्वात उंचीवरील शेवटचे खेडेगाव आहे. ‘इंडियाज लास्ट विलेज’ अशी त्याची ओळख आहे. ते ११ हजार ३२० फूट उंचीवर आहे. या गावापासून पुढे पाच किलोमीटरवर देशाची सीमा आहे. त्यामुळे या गावापासून पुढे जाण्यास लष्कराचे निर्बंध आहेत. या गावात या बारा जणांनी मुक्काम केला त्यानंतर ते हिक्किमला गेले. हिक्किम हे जगातले सर्वात उंचीवरचे पोस्ट ऑफिस. ते १४ हजार ५६७ फूट उंचीवर आहे. भारतीय टपाल विभाग किती खडतर परिस्थितीत टपालाची ने-आण करतो, याचे हे पोस्ट ऑफिस जिवंत उदाहरण आहे. तेथे हे सर्वजण पोहोचले. या पोस्टात त्यांनी आपल्या पत्त्यावर पत्र टाकले. खरोखर या पोस्टातून कोल्हापूरपर्यंत पोहोचते का?, याची खात्री करून घेतली. सांगायचे विशेष हे, की ही मंडळी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर दोन-चार दिवसांनी त्यांची पत्रे कोल्हापुरात त्यांच्या पत्त्यावर आली. या सर्वांनी त्यानिमित्ताने भारतीय टपाल खात्याची कार्यक्षमता अनुभवली. या मोहिमेत महेश दैव हे मोपेडचे तंत्रज्ञ सोबत होते. रोज सकाळी ते प्रत्येक मोपेड चेक करत होते. त्यानंतरच प्रवासाला सुरुवात करत होते. वाटेत काही अडचणी अनपेक्षितपणे आल्या. या सर्वांनी त्या जिद्दीने दूर केल्या आणि साहसी खेळात कोल्हापूरकर मागे नाहीत. याच्या खुणा त्यांनी या मार्गावर ठळकपणे उमटवल्या.

मोहिमेतील सहभागी शिलेदार

अरुण बेळगावकर, प्रसाद मुंडले, प्रसाद कोल्हापुरे, ऐश्वर्या कोल्हापुरे, कौसल्या कारंडे, अनिता मुदगल, आशीष मुदगल, सुरेश चौगुले, रेड्डी साहेब, महेश दैव, सतीश पाटील, शार्दुल पावनगडकर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapurkar Reach Post Office At Highest Altitude