मंजूर न झालेल्या रस्त्याबाबत मंजुरीचे दावे!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

साबळेवाडी ते वेळेकामथी रस्त्याप्रश्‍नी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठेसाठी खोटी लढाई

कोंडवे - मंजूर न झालेल्या रस्त्यावर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस दावे- प्रतिदावे करू लागले आहेत. आतापर्यंत या रस्त्यावरून प्रवास करताना किती प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे, किती प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे, हे येथील जनतेला ठाऊक आहे. दैनिक ‘सकाळ’ने याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. खरे पाहता भविष्यात हा रस्ता मंजूर झाल्यास त्याचे सर्व श्रेय हे येथील जनतेलाच द्यावे लागेल, असे सुज्ञ नागरिक बोलताना दिसत आहेत. 

सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेतून प्रस्ताव सादर करून पालकमंत्र्यांसह स्थानिक दोन आमदारांची एक समिती नेमली जाते व त्यानंतर रस्त्यांना मंजुरी दिली जाते; परंतु मंजूरच न झालेल्या रस्त्यांवर दावे- प्रतिदावे करणारे रथी - महारथी सध्या काही ठिकाणी बिनधास्तपणे थापा मारताना दिसत आहेत.

साबळेवाडी ते वेळेकामथी हा रस्ता गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. हा रस्ता होण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहेत. मागील महिन्यातच येथे अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा दौरा होऊन गेला. पक्षप्रवेश आणि मेळाव्याच्या ठिकाणी श्री. बापट यांनी या रस्त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो आणि हा रस्ता मंजूर करून आणला.

मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटून या रस्त्याचा प्रस्ताव मागवून आमच्यामुळेच हा रस्ता होणार, असे सांगण्यात आले. येथील आमदारांना जे जमले नाही ते आमच्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी करून दाखविल्याचेही श्री. बापट यांनी आवर्जून सांगितले; परंतु याच रस्त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘बॅनर’ लावलेले होते. जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम यांनी हा रस्ता आम्हीच मंजूर करून आणला आहे व तो आमच्या माध्यमातूनच होणार असल्याचे सदर बॅनरमध्ये दर्शवून या मंजूरच न झालेल्या श्रेयवादात उडी घेतली आहे.

भाजपच्या अनेक आमदार-खासदारांच्या, तसेच मंत्र्यांच्या सतत संपर्कात असणाऱ्या वेळे गावच्या शशिकांत पवार यांनीही या रस्त्याबाबत युवकांना एकत्र घेऊन प्रत्येक गावात घंटानाद केल्याने भाजपनेच पुढाकार घेऊन रस्ता मंजुरीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. 

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने साबळेवाडी ते वेळेकामथी या मंजूर न झालेल्या रस्त्याबाबत श्रेय लाटण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी येथील जनताच ठरवेल, की हा रस्ता आता कोणाच्या माध्यमातून होणार आहे ते. हा रस्ता आज होईल किंवा उद्या होईल; परंतु वेळ्याचे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आता स्वतःच या रस्त्यावर मुरूम टाकून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

रस्त्याला कोणाकडूनही मंजुरी नाही - कदम
सातारा जिल्हा परिषदच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. कदम यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले ‘‘हा रस्ता आमच्या ‘कोअर नेटवर्क’मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे; परंतु अद्यापही या रस्त्याला कोणाकडूनही मंजुरी आलेली नाही.’

Web Title: kondave satara news Sanctioned road clearance road