तपासातील अनेक बाबींवर आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

तपासी अधिकाऱ्यांची उलट तपासणी; सरकारी पक्षाने आक्षेप फेटाळले
नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्याच्या सुनावणीत आज तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची मुख्य आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासातील अनेक मुद्द्यांवर वकिलांनी आक्षेप घेतला.

तपासी अधिकाऱ्यांची उलट तपासणी; सरकारी पक्षाने आक्षेप फेटाळले
नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्याच्या सुनावणीत आज तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची मुख्य आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासातील अनेक मुद्द्यांवर वकिलांनी आक्षेप घेतला.

सरकारी पक्षाने काल गवारे यांची सरळ तपासणी घेतली होती. आरोपी जितेंद्र शिंदे याचे वकील ऍड. योहान मकासरे यांनी आज त्यांची उलट तपासणी घेतली. त्यात त्यांनी तपासातील अनेक बाबींवर आक्षेप घेतला. मूळ खबर अहवाल, मूळ फिर्यादीच्या दोन प्रतींतील तफावतीवर त्यांचा आक्षेप होता. त्यावर गवारे म्हणाले, 'प्रती तयार करताना वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिल्याने त्यात बदल झाला. मात्र, मजकूर एकच आहे.'' आरोपीला अटक केली, तेव्हा नियमाप्रमाणे त्याच्या नातेवाइकांना कळविले होते का, आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे जप्त केलेले असताना, पोलिस कोठडी मागण्याचे कारण काय, भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याने दिलेला घटनास्थळाचा नकाशा, मृत मुलीचे सरकारी रुग्णालयात काढलेले छायाचित्र, ते काढणारा छायाचित्रकार शासनमान्य आहे का, मूळ फिर्यादीने घटनास्थळ दाखविले नाही, असे अनेक प्रश्‍न तपासी अधिकाऱ्यांना विचारले.

घटनेनंतर जाळलेली दुचाकी आरोपीची नाही, हे दोषारोपपत्रातील कागदपत्रांवरून दिसते. तपासी अधिकाऱ्यांनी मात्र ती दुचाकी शिंदे याचीच असल्याचे सांगितले. मुलीच्या सायकलजप्तीचा मुद्दाही उलट तपासणीत पुढे आला. मुलीची सायकल 14 तारखेला नव्हे, तर 20 तारखेला जप्त केल्याचे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. मात्र, गवारे यांनी 14 तारखेलाच ती जप्त केल्याचे सांगितले. मुलीची सायकल, आरोपीची जळालेली दुचाकी आज न्यायालयात आणली होती. या वेळी ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. प्रकाश आहेर उपस्थित होते. राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले, ""आरोपीच्या वकिलांनी घेतलेले आक्षेप दखल घेण्याजोगे नाहीत. त्याचा खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही.''

आजही उलट तपासणी
मुख्य आरोपीच्या वकिलांनी गवारे यांची उलट तपासणी घेतल्यानंतर उद्या (बुधवारी) आरोपी संतोष भवाळ याचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे हे त्यांची उलट तपासणी घेणार आहेत. स्टेशन डायरीतील कागदपत्रांवर आक्षेप घेत, मूळ नोंदवही हजर करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. न्यायालयाने तो मान्य केला.

Web Title: kopardi case objection on inquiry