रस्ता ब्लॉक!

संजय साळुंखे
शुक्रवार, 13 जुलै 2018

सातारा - सातारा-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोरेगाव ते म्हसवड दरम्यान ठिकठिकाणी रस्ता उखडण्यात आला आहे. मात्र, पर्यायी रस्ता चांगला नसल्याने चालकांना चिखलातूनच कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे एक ‘आव्हान’च आहे. या स्थितीमुळे अनेक जण दुसऱ्या मार्गाने जाणेच पसंद करू लागलेत. रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांसह प्रवासी, चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी गप्प असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

सातारा - सातारा-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोरेगाव ते म्हसवड दरम्यान ठिकठिकाणी रस्ता उखडण्यात आला आहे. मात्र, पर्यायी रस्ता चांगला नसल्याने चालकांना चिखलातूनच कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे एक ‘आव्हान’च आहे. या स्थितीमुळे अनेक जण दुसऱ्या मार्गाने जाणेच पसंद करू लागलेत. रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांसह प्रवासी, चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी गप्प असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात रुंदीकरणासाठी रस्त्याकडेची झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. यापूर्वीच कटगुण ते म्हसवड दरम्यानचे काम सुरू आहे. गोंदवले बुद्रुक परिसर वगळता सर्वत्र रस्ते उखडले आहेत. ही स्थिती सध्या कुमठे फाटा ते पुसेगाव दरम्यान झाली आहे. 

दुचाकीस्वारांचे अपघात ठरलेले
ठिकठिकाणी पर्यायी रस्ते तयार केलेत. त्यावर खडीकरण किंवा मुरमीकरण केलेले नाही. पाऊस झाला की पर्यायी रस्त्यांवर चिखल तयार होतो. त्यातून कसरत करतच वाहने चालवावी लागतात. त्यातही दुचाकीस्वारांचे हाल पाहावत नाहीत. दररोज दुचाकीस्वारांचे अपघात ठरलेलेच झालेत. या रस्त्याने गेल्यानंतर चारचाकी वाहन धुवून घेण्याशिवाय पर्याय राहात नाही.

वेळेचा अपव्यय, इंधनावरही खर्च
सध्या साताऱ्याहून पुसेगावला जाण्यासाठी एकऐवजी दीड तासांचा कालावधी लागतो. रस्त्याच्या कामामुळे प्रत्येक प्रवासी, चालकांचा अर्धा तास वाया जात आहे. त्याशिवाय प्रत्येक वाहन अर्धा तास जास्त चालल्याने इंधनाचा खर्चही वाढत आहे. वाहन धुण्याचा खर्च वेगळाच. एकूणच या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

वारकऱ्यांनाही होणार त्रास
सातारा-पंढरपूर या मार्गाने अनेक वाऱ्या जातात. यंदाही वाऱ्यांचे प्रस्थान सुरू झाले आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांप्रमाणे वारकऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. दिंड्या जाताना जर पाऊस झाला तर पर्यायी रस्त्यावरील चिखलात चालणेही वारकऱ्यांना मुश्‍कील होणार आहे.

अन्य मार्गांनी प्रवासाला पसंती
साताऱ्याहून पुसेगाव किंवा म्हसवडला जायचे असल्यास वाहनचालक पर्यायी मार्गांना पसंती देऊ लागले आहेत. पर्यायी रस्त्यावरील चिखलाचा धसका घेऊन हे चालक जादा अंतर असले तरीही अन्य मार्गांनीच प्रवास करताना दिसतात. पुसेगावला जायचे झाल्‍यास रहिमतपूर मार्ग निवडला जातो. दहिवडीला जाण्यासाठीही चालक रहिमतपूर, वडूज मार्ग निवडतात.

ठेकेदारांचा मनमानी कारभार
या रस्त्याचे काम अनेक ठेकेदार करताना दिसतात. त्यामुळे कामात सुसूत्रता दिसत नाही. रस्ते उखडताना ठेकेदारांकडून पर्यायी रस्त्यांच्या दर्जाचा विचार केला जातोय की नाही असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. खडीकरण, मुरमीकरण न करताच केलेले पर्यायी रस्ते पावसात चिखलमय होतात. चिखल जास्त झाला की तो जेसीबीने काढला जातो. पण, रस्त्याच्या मजबुतीकरणाचा विचार होत नाही.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या रस्त्याच्या सध्याच्या वाईट अवस्थेमुळे स्थानिकही त्रस्त झालेत. पर्यायी रस्त्यांच्या दर्जाबाबत कोणीही लक्ष देत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार बोलायला तयार नाहीत. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष दिसते. पालकमंत्री, सहपालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी पावसात या रस्त्याने प्रवास करून अनुभव घ्यावा, असे त्रासलेले वाहनचालक व स्थानिक बोलू लागलेत.  

नियोजित रस्त्याच्या कामास कोणाचाही विरोध नाही. पर्यायी रस्त्यांच्या स्थितीमुळे अनेक गावांतील ग्रामस्थांत नाराजी आहे. ठेकेदारांनी हे पर्यायी रस्ते तातडीने चांगल्या दर्जाचे करावेत, अन्यथा स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- महेश शिंदे, युवा नेते, भाजप

Web Title: koregaon pusegaon road block road work